बोदलकसा पक्षी व पर्यटन महोत्सवाने मिळणार पर्यटनाला चालना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:22+5:302021-02-17T04:35:22+5:30
गोंदिया : जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. तलावांची संख्या, दरवर्षी होणारे परदेशी पाहुण्यांचे आगमन, वनसंपदा, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ...
गोंदिया : जिल्ह्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. तलावांची संख्या, दरवर्षी होणारे परदेशी पाहुण्यांचे आगमन, वनसंपदा, नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, हाजराफॉल, कचारगड, बोदलकसा या सारखी महत्वपूर्ण पर्यटन स्थळे आहेत. पण त्यांची फारशी प्रचार प्रसिध्दी झाली नसल्याने या पर्यटन स्थळांपासून पर्यटक सुध्दा अनभिज्ञ आहेत. यासाठीच बोदलकसा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच २७ व २८ फेब्रुवारीला बोदलकसा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची पर्यटकांना ओळख करून देऊन त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली जाणार आहे. यासाठी बोदलकसा पक्षी महोत्सव, पक्षी निरीक्षण, वनभ्रमंती, लोककला, परिसंवाद, स्लाईड शो, छायाचित्र प्रदर्शन, जिल्ह्यातील विविध वृक्षांची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे पुस्तकांचे प्रदर्शन सुध्दा येथे ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे ५० हून अधिक स्टॉल असणार आहेत. बोदलकसा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे हाच या मागील उद्देश असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.
.......
पक्षी व पर्यावरण तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
बोदलकसा पर्यटन व पक्षी महोत्सवा दरम्यान पक्षी आणि पर्यावरण तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे महत्व आणि त्यांची वैशिष्ट्ये किरण पुरंदरे, डाॅ. राजेंद्र जैन, मुकुंद धुर्वे, रुपेश निंबार्ते आदी मार्गदर्शन करणार आहेत.
......