तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:15 PM2017-10-05T21:15:37+5:302017-10-05T21:15:52+5:30
शारदा विसर्जनासाठी गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शारदा विसर्जनासाठी गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. तरुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने बुधवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तलावात एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो त्या तरुणाचा असल्याची खात्री पटली.
अंकुश राजेश उके (१९) रा.संजयनगर, असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गोविंदपूर मार्गावरील एका सार्वजनिक शारदा उत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शारदादेवीचे विसर्जन मंगळवारी रात्री छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावात करण्यात आले.
अंकुश सुध्दा त्याच्या मित्रांसह शारदा विसर्जनाकरिता या तलावावर गेला होता. दरम्यान अंकुश आणि त्याचा मित्र तलावात उतरले. मात्र काही वेळानंतर त्याचा मित्र बाहेर आला पण अंकुश बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्राने तलाव परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळला नाही.
मंगळवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आल्याने रात्री तलावात शोध मोहीम राबविता आली नाही. दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजतापासून स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने तलावात नावेच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी (दि.५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास फिरायला जाणाºया काही नागरिकांना तलावात मृतदेह तरंगाताना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तलावात मृतदेह बाहेर काढला. दरम्यान अंकुशच्या कुटुंबीयांना बोलावून तो मृतदेह अंकुशचाच असल्याची खात्री पटवून घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वविच्छेदनगृहात पाठविला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती.
तरुणाचा शोध घेण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी नगरसेवकांसह तलाव परिसरात पोहोचत मदत केली.
कुटुंबीयांची दोन दिवसांपासून धडपड
मंगळवारच्या रात्री अंकुश तलावात बुडाल्याची शंका व्यक्त केली जात होती. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची धडपड सुरू होती. बुधवारी दिवसभर तलावात शोध मोहीम राबविल्यानंतरही अंकुशचा शोध लागला नव्हता. त्यामुळे तो कुठेतरी निघून गेला असावा, तो परत येईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. त्यांचे सर्व लक्ष अंकुशकडे लागले होते. अंकुश सुखरुप घरी परतेल अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होती. मात्र गुरूवारी (दि.५) त्याचा मृतदेह तलावात मिळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांच्या दुख:ला पारा उरला नाही.
कुटुंबात सर्वात लहान होता अंकुश
अंकुश हा त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान होता. त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. अंकुशचा एक भाऊ कामासाठी बाहेर राहतो. अंकुश गोंदिया रेल्वेस्थानकावर चहा विक्रीचे काम करायचा.