अनुदान लाटण्यासाठी बोगस विद्यार्थी भरती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:24+5:302021-09-14T04:34:24+5:30
भाग : १ संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्याच्या नावात अंशतः बदल करून त्याची दुसरी स्टुडंट आयडी तयार करण्याचा ...
भाग : १
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव : विद्यार्थ्याच्या नावात अंशतः बदल करून त्याची दुसरी स्टुडंट आयडी तयार करण्याचा गोरखधंदा तालुक्यात सुरू आहे. शाळेत प्रवेश दाखवून शासनाचे अनुदान लाटण्यासाठी हा खटाटोप केला जात असल्याचे निदर्शनास येते. शासनाने पट पडताळणी केल्यानंतर कायदा करूनही शक्कल लढवून अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षण दानाचे पवित्र कार्य करणाऱ्या क्षेत्रात अशीही बनवाबनवी सुरू आहे. राज्यात आणखी अशा किती शाळा आहेत याची तपासणी करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटांतील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र शासनाने हा कायदा २००९ मध्ये आणला. या कायद्यात सर्व खासगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारदर्शक अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २० ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये ठरवून दिली आहेत. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या पोर्टलवरून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पहिल्या वर्गातील पटसंख्येच्या २५ टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाते. राज्य सरकारकडून निवड झालेल्या प्रती विद्यार्थ्यांमागे १७ हजार ६७० रुपये शाळांना अनुदान दिले जाते. पहिल्या वर्गात अधिकाधिक पटनोंदणी दर्शवून त्याच्या २५ टक्के विद्यार्थ्यांचे पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. अगदी मोठ्या व नामांकित शाळांत विद्यार्थी प्रवेशासाठी कवायत करावी लागत असतानाच छोट्या शाळेत तोंडावर बोटे ठेवावीत एवढी विद्यार्थी पटसंख्या दिसून येत आहे. याचा आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता अनेक आश्चर्यकारक तथ्य उघडकीस आले आहे.
स्थानिक सरस्वती शिशुमंदिर उच्च प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गातील स्टुडंट पोर्टलवर सात विद्यार्थ्यांचे नाव व आडनावात अंशतः बदल, तसेच जन्मतारखेत बदल करून एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या स्टुडंट आयडी तयार करण्यात आल्या आहेत. एकाच नावाचे दोन विद्यार्थी पहिल्या वर्गात या शाळेत नोंदणी झाले असल्याचे पोर्टलवर दिसून येत आहे. एकाच नावाच्या तीन स्टुडंट आयडी तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनीच्या नावाच्या जन्मतारीख वेगवेगळ्या व वडिलांच्या नावात अंशतः बदल दर्शविण्यात आला आहे. हा शाळेच्या स्टुडंट पोर्टलचा दोष की विद्यार्थ्याची बोगस भरती? हा प्रश्न कायम आहे. या शाळेच्या पोर्टलवर ६२ विद्यार्थी दिसून येत असले तरी प्रत्यक्ष हजेरीपटावर मात्र ४५ विद्यार्थीच असल्याचे दिसून येते.
..............
अबब जन्मतःच शाळेत प्रवेश
अबब....ऐकावे ते नवलच. जन्मतःच कुणी शाळेत प्रवेश घेत असल्याचे आपण ऐकले आहे का? नाही ना .... सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळेच्या पोर्टलवर दोन्ही विद्यार्थिनींचा जन्म २०१५ यावर्षी झाला आहे. या शाळेच्या पोर्टलवर नोंदणी असल्याचे दिसून येत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे दोघींचाही स्टुडंट आयडी २०१५ या वर्षातील आहे. याचा अर्थ ज्यावर्षी यांचा जन्म झाला त्याच वर्षीची स्टुडंट आयडी कशी काय शक्य आहे?