रेतीची अवैध चोरी करणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बंधपत्र
By नरेश रहिले | Published: July 5, 2024 07:39 PM2024-07-05T19:39:07+5:302024-07-05T19:39:25+5:30
- चांगली वर्तणूक राखण्याचे आदेश : तिरोडाच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांचा निकाल.
नरेश रहिले, गोंदिया : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी महेश भरतलाल दोनोडे (३५, रा. धापेवाडा) याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २७१ (२) द्वारे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ नुसार शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी धरले आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट, १९५८ च्या कलम ४ नुसार त्याला पाच हजार रूपये एका वर्षाच्या कालावधीसाठी तत्सम रकमेच्या जामीनासह बॉण्डची अंमलबजावणी केल्यावर सोडण्यात येईल. हा आदेश गुरूवारी (दि.४) तिरोडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी दिला आहे.
वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे खनन करून ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५- जी ८५३० मध्ये एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना ९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी महेश दोनोडे याला पकडण्यात आले होते. त्यावेळी पोलिस हवालदार धर्मपाल भुरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द दवनीवाडा पोलिस ठाण्यांत भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पाच लाख सहा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार लिल्हारे यांनी केला होता. आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे गोळा करून गुन्ह्याच्या तपासाअंती दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
या प्रकरणावर गुरूवारी (दि.४) सुनावणी करताना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. आर. बडवे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम २७१ (२) अन्वये आरोपीला दोषी धरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २७१ (२) द्वारे भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ नुसार शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी धरले आहे. तथापि, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट, १९५८ च्या कलम ४ नुसार त्याला पाच हजार रूपये एका वर्षाच्या कालावधीसाठी तत्सम रकमेच्या जामीनासह बॉण्डची अंमलबजावणी केल्यावर सोडण्यात येईल. या कालावधीत शांतता आणि चांगली वर्तणूक राखेल आणि त्याला हजर राहून बाँडच्या अटींचा भंग केल्यास ठोठावण्यात येणारी शिक्षा मिळेल. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मिर्झा यांनी बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी दवनिवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गजभिये यांनी सहकार्य केले.
वर्षभर करावे लागणार या अटींचे पालन
- एका वर्षाच्या कालावधीत आरोपीने अटींचे पालन करावे असे न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. यात आरोपी हा प्रामाणिकपणे आणि शांततेने जगेल आणि प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करेल. तो भारतात लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे दंडनिय असा कोणताही गुन्हा करणार नाही, तो नशा करण्यापासून दूर राहील, तो वाईट पात्रांशी संबंध ठेवणार नाही, आरोपींनी भरपाईची रक्कम सहा हजार रूपये न्यायालयात आजपासून १४ दिवसांच्या आत शासनाला भरण्यासाठी देण्यात यावी अशी अट ठेवण्यात आली आहे.