बोंडगावदेवी ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी पॅनलने गड कायम राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:55+5:302021-01-21T04:26:55+5:30
बोंडगावदेवी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ग्रामपंचायतच्या चार प्रभागातील ११ जागांसाठी भाजप समर्थित सर्वधर्मसमभाव पॅनल, काँग्रेस-आरपीआय समर्थित ग्रामविकास ...
बोंडगावदेवी ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ग्रामपंचायतच्या चार प्रभागातील ११ जागांसाठी भाजप समर्थित सर्वधर्मसमभाव पॅनल, काँग्रेस-आरपीआय समर्थित ग्रामविकास एकता पॅनल, युवा परिवर्तन पॅनलने एकूण ३० उमेदवार रिंगणात उतरविले होते. तिन्ही पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. युवा परिवर्तन पॅनलने दोन प्रभागात उमेदवार उभे करून निवडणूक रिंगणात पहिल्या प्रथमच उडी घेतली. भाजप समर्थित सर्वधर्मसमभाव पॅनलचे चारही प्रभागात उमेदवार एकास-एक सरस होते. आठ उमेदवार विजयी झाले असले तरी प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजप समर्थित पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. यात विरोधक काँग्रेस-आरपीआय समर्थित पॅनलने दोन्ही जागा काबीज केल्या. भाजप समर्थित सत्ताधारी सर्वधर्मसमभाव पॅनलचे विजयी उमेदवारांमध्ये राधेश्याम झोळे, माधुरी गोंधळे, निराश मेश्राम, उषा पुस्तोडे, माया मेश्राम, भाग्यवान फुल्लके, प्रतिमा बोरकर, सरिता नेवारे, काँग्रेस-आरपीआय समर्थित ग्रामविकास एकता पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये श्यामकांत नेवारे, श्रीकांत बनपूरकर, अमरचंद ठवरे यांचा समावेश आहे.
बॉक्स
राधेश्याम झोळे यांची हॅट्ट्रिक
ग्रामपंचायत निवडणुकीत राधेश्याम झोळे यांनी एकाच वाॅर्डातून हॅट्ट्रिक साधली. सतत तीन पंचवार्षिक ते निवडून येत आहे. मागील वेळी त्यांनी सरपंचपदसुद्धा उपभोगले.
.....
३ माजी सरपंच सभागृहात
यावेळी ग्रामपंचायत सभागृहात एकाच वेळी तीन माजी सरपंच पहायला मिळणार असल्याचा योग येणार आहे. डॉ. श्यामकांत नेवारे, राधेश्याम झोळे, भाग्यवान फुल्लुके हे माजी सरपंच यावेळी निवडून आले. जुन्या-नव्यांचा संगम ग्रामपंचायतमध्ये असणार आहे.
....
एका मताने विजयी
प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण स्री प्रवर्गातून भाजप समर्थित पॅनलच्या माया धर्मेंद्र मेश्राम एका मताने विजयी झाल्या. माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या दीपिका राजकुमार गजभिये यांना निसटता पराभव झाला. भाजप पॅनलच्या माया मेश्राम यांना २३९ मते, तर काँग्रेस-आरपीआय समर्थित ग्रामविकास एकता पॅनलच्या दीपिका गजभिये यांना २३८ मते पडली. एका मताच्या जय-पराजय निश्चितच जिव्हारी लागून केला.