बोनसचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:26 PM2019-02-24T22:26:52+5:302019-02-24T22:27:37+5:30
मागील दोन तीन महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर शनिवारी (दि.२३) संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील शेंदूरवाफा येथे आयोजित एका कार्यक्रमात धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन तीन महिन्यांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकºयांची प्रतीक्षा अखेर शनिवारी (दि.२३) संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील शेंदूरवाफा येथे आयोजित एका कार्यक्रमात धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली. मात्र या बोनसचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील मोजक्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर या निर्णयाचा लाभ काही व्यापारी घेण्याच्या तयारीत आहेत.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशने २३ फेब्रुवारीपर्यंत १३ लाख ४५ हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने ५ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत २२५ कोटी रुपये असून ४२ हजार शेतकºयांनी धानाची विक्री केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर जवळपास १२ ते १५ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. त्यामुळे तेवढ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनसचा लाभ मिळेल हे स्पष्ट आहे. शिवाय यानंतर काही शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्यात त्यात वाढ होवू शकते.
मात्र सध्या स्थितीत शेतकऱ्यांकडे फार कमी प्रमाणात धान शिल्लक आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर फारशी आवक राहण्याची शक्यता कमी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांचा विचार केल्यास हा आकडा फार कमी आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार शेतकरी असून त्यातुलनेत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहता फार कमी आहे.आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची संख्या अद्यापही एक लाखावर पोहचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अधिक धानाची विक्री केल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. परिणामी बोनसचा लाभ केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
बोनस उशिरा जाहीर केल्याचाही फटका
शासनाने यंदा अ दर्जाच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव दिला. तर लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या सरकारने धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल भाव जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्र शासनावर सुध्दा शेतकऱ्यांकडून दबाब वाढला होता. दरवर्षी धानाला सुरूवातीला बोनस जाहीर केला जात होता. मात्र यंदा सरकारने बोनस जाहीर करण्यास उशीर केला. धानाला ५०० रुपये बोनस जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र बºयाच शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री केल्याने बोनसचा लाभ या शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही हे स्पष्ट आहे.
व्यापाऱ्यांकडे मोठा साठा
धानाला आज नाही तर उद्या बोनस जाहीर होईल ही अपेक्षा होतीच. त्यामुळे बºयाच खासगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून कमी दराने धानाची खरेदी केली होती. त्यामुळे सध्या स्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धानाचा साठा आहे. काही व्यापारी आता १५०० ते १६०० रुपये क्विंटलने खरेदी केलेला धान शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर विक्री करुन बोनसचा फायदा मिळवून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
घोषणा होताच पोस्टरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला ५०० रुपये क्विंटल बोनस जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी सोशल मीडियावर आणि विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्टर तयार करुन श्रेय लाटण्यास सुरूवात केली. त्यामुळे या पोस्टरबाजांची सुध्दा सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होती.
छत्तीसगड व मध्यप्रदेशच्या तुलनेत भाव कमीच
लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव दिला जात आहे. तर त्यातुलनेत महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिला जाणारा हमीभाव कमीच आहे. सध्या महाराष्ट्रात धानाला १७५० रुपये हमीभाव आणि ५०० रुपये बोनस असा एकूण २२५० रुपये क्विंटल भाव मिळणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या तुलनेत २५० रुपये हमीभाव कमीच आहे. तर लागवड खर्चाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना बोनस मिळाल्यानंतर हातात किती पैसे शिल्लक राहणार याचा सुध्दा विचार करावा लागणार आहे.