पुस्तक जीवन जगण्याचा मार्ग सांगते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:07 PM2018-10-07T22:07:59+5:302018-10-07T22:10:00+5:30
मुलांनो उच्च स्वप्न बघा. उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुलांनो उच्च स्वप्न बघा. उंच भरारी घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याजवळ दोन आणे असतील तर एक आण्याची भाकर घ्या व एक आण्याचे पुस्तक घ्या असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. कारण, भाकर तुमच्या शरीराचे पोषण करते तर पुस्तक जीवन जगण्याचा मार्ग सांगते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.
महाराष्ट्र आॅफीसर्स फोरम गोंदिया शाखेच्यावतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या अनु.जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर चंद्रीकापुरे, सेवानिवृत्त कृषी अधिक्षक विकास सुटे, शिवदास वासे, कमल बोम्बार्डे, उपअभियंता (सिंचन) एस.पी.शहारे, सहा. जि. नियोजन अधिकारी संदीप भिमटे, मधु बंसोड उपस्थित होते. कार्यक्रमात संतकबीर ज्यु. कॉलेज सिवनी, मनोहर म्युनिसिपल गोंदिया, पंचशील हायस्कूल मक्काटोला, राजस्थानी कन्या, बीएजे हायस्कूल, सुकन्या संकल्प काटी, लालचंद ज्यु. कॉलेज दासगाव, अनुसया पशीने ज्यु. कॉलेज दासगाव, शारदा ज्यु. कॉलेज रतनारा, फुलचूर हायस्कूल, श्रीराम हायस्कूल खमारी, महावीर मारवाडी हाय., संस्कार हायस्कूल गोंदिया इ. शाळांतील विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यांचा ‘वास्तव’ नावाचे पुस्तक, एक गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह व एक मिठाईचे पॅकेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्तावीक जिल्हाध्यक्ष डॉ. माधवराव कोटांगले यांनी मांडले. संचालन डॉ. सी.टेंभूर्णे यांनी केले. आभार उपाध्यक्ष राजरतन कुंभारे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी चंद्रगुप्त अंबादे, आशा रामटेके, सुनिल पटले, डोंगरवार, रमेश तनवानी, एच.जी.मेश्राम, इंद्रपाल बागडे, सुरेंद्र राऊत, सिमा गणवीर, धाबर्डे, चंदु बडवाईक, संथागारचे संचालक रोशन मडामे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.