शाळा सत्र सुरू होऊनही पुस्तके हातात पडली नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 PM2021-07-12T16:20:40+5:302021-07-12T16:23:48+5:30
Gondia News पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षणाचा सक्तीचा अधिकारअंतर्गत शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यानुसार, यंदा सर्व शिक्षा अभियानकडून जिल्ह्यातील ९५७८८ विद्यार्थ्यांसाठी ५८८१२७ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून शाळा सत्र सुरू झाले असून पुन्हा ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे.
मात्र आश्चर्याची बाब अशी की, अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आलेली नाहीत. अशात या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा असा प्रश्न पडत आहे. अगोदरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कित्येकांकडे स्मार्टफोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. तर काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने तेही शिक्षणाला मुकत आहेत. त्यात आता ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल व नेटवर्क आहे त्यांची पुस्तकेच हाती नसल्याने अडचण होत आहे. आता कुठे पुस्तकांचे वितरण सुरू झाले असून ते झाल्यावरच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्याचा अनुभव येणार.
१० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत
पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार ?
आमचा ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे. मात्र, आमच्या हाती आतापर्यंत पुस्तके आलेली नाहीत. अशात आम्ही अभ्यास कसा करावा. पुस्तके हाती आल्यावरच आम्हांला त्यातील काही समजणार. त्यामुळे आता पुस्तकांची वाट पहात आहे.
- कर्णिका रहिले (पदमपूर)
कोरोनामुळे यंदाही ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यास करण्यासाठी आम्हांला पुस्तकांची गरज असून ती आम्हांला आतापर्यंत मिळालेली नाहीत. अशात आता आम्ही ऑनलाईन वर्गात राहून अभ्यास कसा करावा. पुस्तकांची वाट बघत आहोत.
- अंश भेंडारकर (अर्जुनी-मोरगाव)
आम्ही सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडील पुस्तके परत घेतली होती. त्या पुस्तकांचे आताच्या विद्यार्थ्यांत वितरण केले आहे. त्यात आता सध्या ब्रिज कोर्स सुरू असून ज्या विदयार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यांचाही अभ्यास बुडणार नाही.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
----------------------------