सुरूवातीलाच मिळणार पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 08:27 PM2018-06-07T20:27:27+5:302018-06-07T20:27:27+5:30
शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र दरवर्षी शैक्षणिक सत्राला दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जात नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र दरवर्षी शैक्षणिक सत्राला दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जात नव्हते. त्यामुळे बरेच पालक पाल्यांसाठी बाजारपेठेतून पुस्तके खरेदी करीत होते. मात्र यंदा या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ लाख ९१ हजार पुस्तके उपलब्ध करुन दिली आहे.
त्यामुळे यंदा सत्राच्या सुरूवातीलाच पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानीत, शासकीय आश्रम शाळा, खासगी अनुदानित आश्रम शाळा, अंशत: अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. यासाठी गोंदिया शिक्षण विभागाने ६ लाख ७५ हजार ५६४ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली होती. त्यापैकी ५ लाख ९१ हजार ५१६ पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तर उर्वरित ८४ हजार ४८ पुस्तके १५ जूनपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे उशिरा पुस्तके मिळण्याची तक्रार करण्याची पाळी यंदा विद्यार्थ्यांवर येणार नाही.
पुस्तकांसाठी २ कोटी ४३ लाख खर्च
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यासाठी २ कोटी ४३ लाख ५८ हजार ६० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तर ३३ लाख ६ हजार ७१८ रूपये शिल्लक आहेत. सडक-अर्जुनी तालुक्याला पुस्तकांसाठी २६ लाख ८६ हजार ८९१ रूपये, अर्जुनी-मोरगाव ३६ लाख ९९ हजार ९१३ रूपये, देवरी २६ लाख ३४ हजार ३९५ रूपये, तिरोडा ३६ लाख ९३ हजार ६०२ रूपये, गोंदिया ७९ लाख ६१ हजार २१२ रूपये, गोरेगाव २३ लाख ९४ हजार ४६८ रूपये, आमगाव २५ लाख ७५ हजार ४४ रूपये, सालेकसा २० लाख १९ हजार २५३ रूपयांचा निधी देण्यात आला.
नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके लवकरच
इयत्ता पहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके सध्या बालभारतीकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ८४ हजार पुस्तके कमी उपलब्ध झाली. १५ जूनपर्यंत सर्व तालुक्यांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.