वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बोगस डॉक्टरांची चांदी
By admin | Published: September 11, 2014 11:38 PM2014-09-11T23:38:50+5:302014-09-11T23:38:50+5:30
सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय
रावणवाडी : सध्याचा हवामानात आर्द्रता आणि उष्णतेत वाढ होऊन सर्वत्र पावसाच्या पाण्याने दलदल निर्माण झाली आहे. डांसाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच रोगांनी थैमान घातले असून परिसरात शासकीय आरोग्य सुविधा हवी तसी उपलब्ध नसल्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.
रावणवाडी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात योग्य सुविधा होत नसल्यामुळे अखेर आजारी रुग्णांना बोगस डॉक्टरंच्या संपर्कात जावून उपचार करून घ्यावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पुरेशा सोयी-सुविधा व आवश्यक औषधाचा साठा उपलब्ध नाही. मुख्यालयात नियमित हजर नसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाणवामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे मुख्यालयी राहण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी यासाठी येथील नागरिकांनी वारंवार आरोग्य प्रशासनाकडे मागणी केली. मात्र आरोग्य विभागाने कसलीच उपाययोजना केली नाही. लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. केवळ मतांसाठी राजकारण करून संधी साधण्याचे काम ते करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सदर गावात आवश्यक असणारी शासकीय आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध होत नाही. याचाच फायदा बोगस डॉक्टर सध्या घेताना दिसत आहेत. सद्यस्थितीत शासकीय आरोग्य केंद्रावर बऱ्याच बाबींचा तुटवडा आहे. येथील खासगी स्वरूपाचेदेखील दर्जेदार रूग्णालय नाही. त्यामुळे बोगस डॉक्टर संधीचे सोने करीत आहेत. प्रशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्याकडून नागरिकांच्या आरोग्याचे खेळ मांडले जात आहे. परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. मात्र या डॉक्टरांना औषधाचा साठा कोण उपलब्ध करून देत आहे? त्याचा शोध घेणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. या भागात आरोग्याबद्दल अनेक समस्या आहेत. मात्र सबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील गोरगरीब रुग्णांना शहरात जावून उपचार करून घेणे कठिण होते. हे गाव ग्रामीण परिसरातील मुख्य गाव असल्यामुळे दरदिवशी शेकडो रुग्ण उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यांचा आधार घेत आहेत. मात्र या खासगी दवाखान्याचे डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे उपचार कमी आणि आर्थिक भुर्दंडच अधिक बसतो. प्रयोगात्मक उपचार करून रुग्णांच्या माथी महागडी औषधे लिहून दिली जातात व रुग्णांची लुबाडणूक केली जाते.
या प्रकाराची जाणीव आरोग्य विभागाला असूनही यावर आळा घालण्यासाठी कुणीही लक्ष देत नाही. (वार्ताहर)