शेततळी ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:49 AM2019-02-07T00:49:46+5:302019-02-07T00:50:30+5:30
मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिलासा दायक चित्र तालुक्यात आहे.
तालुक्यात ३० हजार हेक्टरच्या जवळपास सिंचनाचे क्षेत्र आहे. कटंगी मध्यम प्रकल्प व कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकासाठी पाणी दिले जाते. मात्र तालुक्यातील बरीच शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तालुक्यातील शेतकºयांना दरवर्षी बसतो.
तालुक्यातील शेतकºयांना कालव्याचा पाण्याचा आधार मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे या कालावधीत फळबाग व ठिंबक सिंचनावर घेतल्या जाणाऱ्या पिकांना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे वरदान ठरत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनांची कामे राबविली. मात्र यामध्ये पाहिजे त्याप्रमाणात पाणीसाठा नाही. मात्र मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी साठवून ठेवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यास शेतकºयांना मदत होत आहे. मार्च २०१६ पासून कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेततळे तयार करणाºया शेतकऱ्यांला जास्तीत-जास्त ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गोरेगाव तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून २०१६-२०१८ या वर्षात १३५ शेततळे पूर्ण करण्यात आली. तर सन २०१८-१९ या वर्षात १४१ शेतकऱ्यांना शेततळ्यांसाठी आॅनलाईन मंजुरी देण्यात आली.
यापुर्वी २०१६ मध्ये तत्कालीन तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी मागेल त्याला शेततळी योजनेतून शंभर टक्के शेततळयाची कामे करुन तालुक्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता आहे.