गोंदिया जिल्ह्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानाला निसर्गाचे वरदान; जागृत देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:01 PM2018-01-05T12:01:53+5:302018-01-05T13:01:55+5:30
जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा जागृत देवस्थान आहे. येथे वर्षाकाठी हजारो पर्यटक भाविक दर्शनासाठी येतात.
दिलीप चव्हाण/वामनराव गोळंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा जागृत देवस्थान आहे. येथे वर्षाकाठी हजारो पर्यटक भाविक दर्शनासाठी येतात. निसर्गरम्य या परिसराला विविधतेने नटलेले आहे. विपुल नैसर्गिक साधन संपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देवस्थानाला खरी झालर आहे ती निसर्गाचीच.
गोरेगाववरुन २५ किलोमीटर मुंडीपार-हरदोली रस्त्यावर हे देवस्थान वसलेले आहे. घनदाट जंगलात एका भव्य दगडाखाली मांडोदेवीची मूर्ती आहे. तर गुफेत भगवान श्रीकृष्ण, अन्नपुर्णा देवी व शिवजीचा वास आहे. तर बाजुलाच भगवान शंकराचीे भव्य मूर्ती आहे. पूर्वेस हनुमानजी, शंकर-पार्वती, हवनकुंड व कलशभवनच्या बाजूला भगवान सूर्यादेव यांची मूर्ती आहे.
सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान संपूर्ण महाराष्टत प्रसिद्ध आहे. या देवस्थानामुळे शंभर कुटुंबाना रोजगार मिळाला आहे. येथे वर्षाकाठी सहा यात्रा भरतात. मकर संक्रात, शिवरात्री, चैत्र नवरात्र (रामनवमी), अखंड रामायण पाठ, अश्विन नवरात्र, मंडई या यात्रांना मध्यप्रदेश, नागपूर, चंद्रपूर, रामटेक, नाशिक या जिल्ह्यातून हजारो पर्यटक भाविक देवदर्शनाला येतात. विशेष म्हणजे मकर संक्रात व रामनवमीला येथे सर्वाधिक गर्दी असते.
पर्यटक भाविक यांनी दानातून येथे लहान-मोठे विकास केले जाते सोबतच येथे काम करणाऱ्या दहा कर्मचारी व मंदिराचा सर्व खर्च दान स्वरुपात प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून केला जातो. तर पुजारी म्हणून ३० वर्षापासून अयोध्यादास बिलोहा पुजापाठाचे काम पाहतात.
लोकप्रतिनिधींची आश्वासने हवीत
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या मांडोदेवी देवस्थानाला राजकारण्यांनी केवळ आश्वासन पूरतेच ठेवलेले आहे. या क्षेत्राचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. जि.प. उपाध्यक्षा रचणा गहाणे यांनी ५० लाख व आ. संजय पुराम यांनी निधी कमी पडू देणार नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणणार असे भाषणातून सांगितले होते. मात्र राजकारण्यांनी दिलेले आश्वासन फक्त आश्वासनच ठरले.
साधू संताने केले होते मार्गदर्शन
मध्यप्रदेश राज्यातून आलेला सूर्यादेव ईश्वरकुर्रा व बहीण मांडोबााई दुखी होवून मांडोदेवी परिसरात आले होते. तेव्हा एका साधू संताने त्या तिन्ही भावंडाना पुण्याचे काम करण्याचे मार्गदर्शन केले. यावर त्यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तलाव खोदण्याचे काम हाती घेतले. आजही ते तलाव अस्तीत्वात आहे. तलावातील पाण्यामुळे पशुपक्षी-जनावरे याच पाण्याचा उपयोग करतात.
तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून मांडोदेवी देवस्थानाला अजूनही विकासासाठी १० कोटी रुपयांची गरज आहे. दररोज येथे पर्यटक, भाविक दर्शनाला येतात. यासाठी या क्षेत्राला सर्वश्रेष्ठ पर्यटन क्षेत्र बनविण्यासाठी मांडोबाई देवस्थान समिती कट्टीबद्ध आहे.
-विनोद अग्रवाल,
सचिव सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती, बघेडा (तेढा)