उखडलेल्या रस्त्यांमुळे बोरावासी त्रस्त, तरीही बांधकाम विभाग म्हणतो रस्ते मस्तच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:48+5:302021-09-19T04:29:48+5:30
तिरोडा : तालुक्यातील ग्राम बोरा येथील एकूण लोकसंख्या २५०० असून या गावाशी सोनेगाव, डब्बेटोला, करटी बु., बघोली, परसवाडा ...
तिरोडा : तालुक्यातील ग्राम बोरा येथील एकूण लोकसंख्या २५०० असून या गावाशी सोनेगाव, डब्बेटोला, करटी बु., बघोली, परसवाडा यांचा दैनंदिन संपर्क येतो; मात्र ये-जा करण्यासाठी असलेले रस्ते उखडले असून खड्डेमय रस्ते वाहतुकीसाठी धोक्याचे बनले आहेत. आता पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल झाला असून त्यातून गावकऱ्यांना रहदारी करताना जीव धोक्यात टाकावा लागत आहे. गावकऱ्यांनी रस्ता बांधकामाची मागणी केली आहे.
येथील मुख्य बाजार चौकात ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारी करणे गैरसोयीचे झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बोरा-परसवाडा रस्ता वाहून गेल्याचे दिसत आहे. तर ग्रामपंचायतीकडे जाणारा व शाळेत जाणारा रस्ता फुटल्यामुळे त्यावर पूर्णतः चिखल झाला आहे. या प्रकारामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गावातील बाजार चौक, ग्रामपंचायत व शाळा हे मुख्य रस्ते असून या गावाशी अनेक गावांतील नागरिकांचा संपर्क येतो. आता रस्ते चिखलमय झाल्यामुळे पायी ये-जा करणाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. प्रसंगी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासन-प्रशासन, पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज असून रस्ता दुरुस्तीची मागणी बोरावासीयांनी केली आहे.