‘महाराष्ट्र’ची हद्द गोंदियापर्यंतच
By admin | Published: November 26, 2015 01:36 AM2015-11-26T01:36:46+5:302015-11-26T01:36:46+5:30
गेल्या १९ वर्षांपासून गोंदियाशी ऋणानुबंध जुळलेली ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ आता छत्तीसगडमधील दुर्गपर्यंत विस्तारित ...
रेल्वेची स्पष्टोक्ती : दुर्गवरून सुटणार नसल्याची ग्वाही
गोंदिया : गेल्या १९ वर्षांपासून गोंदियाशी ऋणानुबंध जुळलेली ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ आता छत्तीसगडमधील दुर्गपर्यंत विस्तारित करण्याच्या अफवांमुळे गोंदियावासीयांमध्ये चांगलाच असंतोष पसरला होता. मात्र याबाबतचे वृत्त हे निराधार असून तसा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला नाही, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनचे जनसंपर्क अधिकारी संतोष कुमार यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दिवसांपासून काही वृत्तपत्रांसह सोशल मिडियावर महाराष्ट्र एक्स्प्रेस आता गोंदियाऐवजी दुर्गवरून सोडली जाणार असल्याचे वृत्त पसरत आहे. गोंदिया ते कोल्हापूर अशी महाराष्ट्राची दोन टोकं जोडणारी ही गाडी दररोज गोंदिया आणि कोल्हापूर येथून सुटते. दररोज सकाळी ८.२० ला ही गाडी सकाळी गोंदियावरून सुटते त्याच वेळी राखीव कोटा सोडून इतर बहुतांश जागा पूर्ण भरलेल्या असतात. साधारण कोचमध्ये जागा कमी पडत असल्यामुळे नागपूर पर्यंत या गाडीतील स्लिपर कोचमध्येही बसण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत दुर्गवरून ही गाडी सुरू केल्यास गोंदियाला येईपर्यंत ही गाडी आधीच भरलेली राहून गोंदियातील प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. त्यामुळे ही गाडी दुर्गवरून सुटेल या कल्पनेनेच गोंदियावासीयांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तात रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाला देत महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुर्गपर्यंत विस्तारीत करण्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दुपारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र एक्स्प्रेस दुर्गवरून धावण्यासंबंधी कोणताही निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला नसल्याचे स्पष्ट केले. असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत नागरिकांना आधीच कळविले जाईल, असेही रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी संतोष कुमार यांनी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)