दोघी मायलेकी जपतात हौशी नाट्य परंपरा
By admin | Published: February 19, 2017 12:09 AM2017-02-19T00:09:50+5:302017-02-19T00:09:50+5:30
मानसाने जीवनात एकतरी लहान-मोठा धंद जोपासला पाहीजे असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात अनेक जण कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता
झाडीपट्टीतील कलावंत : ऐतिहासिक नाटकांतून अभिनयाचे सादरीकरण
अमरचंद ठवरे बोंडगावदेवी
मानसाने जीवनात एकतरी लहान-मोठा धंद जोपासला पाहीजे असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात अनेक जण कोण काय म्हणेल याची तमा न बाळगता अनेक प्रकारचे छंद जोपासत असतात. झाडीपट्टी रंगभूमीवर अशाच दोन मायलेकी ऐतिहासिक नाटकांमध्ये भूमिका करण्याचा छंद जोपासत असून त्यांची ही नाट्याभिनयाची हौस परिसरात कौतुकाची ठरत आहे.
रंगभूमीवरुन ऐतिहासिक नाटकातील पात्रांना न्याय देण्याचा कसोसीने प्रयत्न लहान ताडगाव या खेडेगावातील तेजवंता माणिक नाकाडे व त्यांची १२ वर्षीय कन्या वैष्णवी अविरतपणे गेल्या काही वर्षांपासून करीत आहे.
आजघडीला महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना सर्वत्र दिसतात. असे एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये महिलांचा सहभाग नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला आपल्या लाजऱ्या स्वभावाने सार्वजनिक क्षेत्रात पुढे येण्यास धजावत नाहीत. मात्र अशाही वातावरणात तेजवंता व वैष्णवी या नायलेकींनी हा समज खोडून काढत ग्रामीण भागातील महिलाही आज कलेची जोपासणा करीत झाडीबोली रंगभूमीला समृद्ध करण्यास हातभार लावत असल्याचा प्रत्यय देत आहे.
घरामध्ये सर्व सुख-सोयी उपलब्ध, सासरी राजकीय वातावरणाचा सहवास लाभलेला, मात्र घरात नाट्याबद्दलचे आकर्षण सर्वांना कायम असल्यामुळे तेजवंता नाकाडे यांना पती माणिक नाकाडे यांनी नाट्याभिनयाची आवड जोपासण्यासाठी कायम पाठबळ दिले. आज दोन्ही मायलेकी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटकांमधून विविध भूमिकांना न्याय देऊन आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. आई-वडीलच्या घरापासूनच म्हणजे शालेय दशेपासून तेजवंता सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. परिसरातील पाटील लोकांना नाटकांचा आधीपासूनच छंद आहे. त्यामुळे घरामधील सांसारिक जबाबदारी सांभाळून या मायलेकी केवळ हौसेखातर नाटकांमधून अभिनय करण्याचा छंद जोपासत आहे.
१२ वर्षाची वैष्णवी ही नाटकामध्ये भूमिका सादर करण्यासबरोबरच उत्तमपणे व्हायोलीनसुद्धा वाजविते. संगीताची आवड असल्याचे तिने आवर्जुन सांगितले. ऐतिहासीक नाटकामध्ये वैष्णवी बालकलाकाराच्या भूमिकेला साजेसा न्याय देते. तेजवंताबाई ऐतिहासीक नाटकातील पुरुषपात्रांना जीव ओतून न्याय देतात. म्हणूनच त्यांच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद मिळते. पती माणिक गोपाल नाकाडे यांच्या प्रोत्साहनामुळेचआपण रंगभूमीवरुन नाटकातील पात्रांना साजेसा न्याय देऊ शकले, अशी प्रतिक्रीया तेजवंता नाकाडे यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.
- नाटकांचे केंद्र ताडगाव
ताडगाव हे गाव नाटकाचे केंद्र समजले जाते. गावामध्ये संपूर्ण स्त्री नट संचात नाट्यप्रयोग साकारल्या जातात. तेजवंता नाकाडे यांनी ऐतिहासिक नाटक संंगीत ‘सिंहाचा धावा’ यामध्ये दुर्योधनाची भूुमिका साकारली. तसेच ‘सैतानी पाश’ मध्ये कंस, ‘सोन्याची द्वारका’ या नाटकात कालीयवन, ‘स्वर्गावर स्वारी’ या नाट्यप्रयोगात हिरण्यकश्यपाच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यातील झरपडा, देवलगाव, तिडका, ताडगाव यासह गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या नाट्य प्रयोगात तेजवंता नाकाडे यांनी रंगभूमीवरुन पात्रांना न्याय देण्याचे काम केले. आपल्यातील एक हौशी कलाकारांची जाणीव नाट्यरसिकांना करुन देण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. आई तेजवंता व मुलगी वैष्णवी या दोघी मायलेकींचा हा छंद परिसरात चर्चेचा झाला आहे.