वधू पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:56 PM2019-03-11T21:56:56+5:302019-03-11T21:57:26+5:30
वधू पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान बाराभाटी-अर्जुनीमोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : वधू पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान बाराभाटी-अर्जुनीमोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
अंकुश बबनराव राऊत (३२) रा. पठाणपुरा वार्ड चंद्रपूर, असे रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील पोहरा लाखनी येथे अंकुश राऊत हा युवक त्याचे भाऊजी चंद्रशेखर वानखेडे यांच्यासोबत रविवारी (दि.१०) विवाहासाठी वधू पाहण्यासाठी गेला होता. वधू पाहुन तो आपल्या भाऊजीसह लाखीवरुन सौंदड रेल्वे स्थानकावार आला. गोंदिया-बल्लारशाह (५८८०४) रेल्वे गाडीने ते चंद्रपूरला जायला निघाले. बाराभाटी ते अर्जुनी मोरगाव दरम्यान अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकापासून ३.५ किलोमिटर अंतरावर दरवाज्यावर उभा असलेल्या अंकुश तोल गेल्याने खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान त्याच्या भाऊजीने चैन पुलींग करुन गाडी थांबविली. अंकुशला शोधण्यासाठी ते मागच्या बाजूला पळत सुटले. रेल्वे गाडी काही वेळाने पुढे निघून गेली.त्यांनी चंद्रपूरला आपल्या घरच्या लोकांना अपघाताची माहिती दिली. कुटुंबीयांनी अर्जुनी मोरगाव येथे राहत अलेले त्यांचे नातेवाईक हरिष पात्रीकर यांना माहिती दिली. पण अपघाताचे नेमके ठिकाणी माहित झाले नाही. चंद्रशेखर यांचा मोबाईल स्वीच आॅफ झाल्यामुळे पात्रीकर आपल्या मित्रासह त्या दोघांचा शोध रात्रीपर्यंत सौंदड ते अर्जुनी मोरगाव दरम्यान घेत होते. चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर मृतक अंकुशचे नातेवाईक गोळा झाले. स्टेशनमास्तरकडे चौकशी केली. त्यांनी इंजिन ड्रायव्हारला बोलावून चौकशी केली असता अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकाच्या आधी ३.५ कि.मी. चैन पुलींग करण्यात आली, यावेळी एक प्रवाशी गाडीतून उतरुन पळाल्याचे सांगितले. पात्रीकर यांनी १०८० खांबाचे नेमके ठिकाण सौंदड रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाला विचारले. त्यांनी अर्जुनी मोरगाव रेल्वे फाटकाजवळ असल्याचे सांगितले. पात्रीकर आपल्या मित्रासह शोध सुरु केला. रात्री १.३० वाजता दरम्यान रेल्वे फाटकापासून अडीच कि.मी. अंतरावर बाराभाटी-अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला अंकुशचा मृतदेह सापडला. चंद्रपूरवरुन आलेल्या नातेवाईकांनी वडसा येथे रेल्वे सुरक्षा बल येथे तक्रार नोंदविली. इकडे पात्रीकर अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये अपघातातील मृतदेह सापडल्याची तक्रार केली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविला. सोमवारी (दि.११) सकाळी ११.३० वाजता श्वविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.
घटनेची नोंद करण्याचा विसर
या अपघाताच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. चैन पुलींग करुन गाडी थांबल्याची नोंद ड्रायव्हरने अर्जुनी मोरगाव रेल्वे स्थानकावर केली नाही. देवलगाव व अर्जुनी मोरगाव स्टेशन मास्तर यांनी चौकशी करुन ड्रायव्हारला विचारल्यावरही त्याने काहीच सांगितले नाही. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तेव्हा स्टेशन मास्तरने ड्रायव्हारला बोलावून विचारणा केल्यावर त्याने सांगितले. रेल्वे गाडीच्या गार्डनेही या अपघाताची दखल घेतली नाही. त्यामुळे नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.