सीईओंच्या बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार
By admin | Published: August 5, 2015 01:53 AM2015-08-05T01:53:14+5:302015-08-05T01:53:14+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून ...
असहकार आंदोलन : प्रलंबित मागण्या निकाली काढा
आमगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा संघटनेने १ आॅगस्टपासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत संघटनेने पंचायत समितीत आयोजित सीईओंच्या आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.
योगेश रुद्रकार या कर्मऱ्यावर केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, विस्तार अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने भरावी, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तालुकास्तरावर पुरस्कारासाठी निवड करावी, सेवेतील कालबद्ध प्रकरणे निकाली काढावी, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करावी, नोव्हेंबर २००५ पूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे, मासिक वेतनाची पुर्तता तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा निधीचे आवरण तत्काळ व्हावे, तेराव्या वित्त आयोगातील खरेदी केलेले प्रिंटर ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावे, ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करण्यात यावे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले.
संघटनेने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणतीच दखल घेतली नाही.
या मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनांशी साधी चर्चासुद्धा घडवून आणण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संघटनेने जिल्हास्तरावर १ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच संघटनेने मंगळवारी (दि.४) आमगाव पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवर बहिष्कार घातला. (शहर प्रतिनिधी)
आंदोलनाचे पडसाद
ग्रामसेवक संघटनेने आमगावपासून सुरु केलेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावरील सभा, कामकाजावर त्याचे पडसाद दिसणार आहे. पुढे या संघटनेने ग्रामपंचायतींना ताळेबंद आंदोलने उभारण्याची तयारी केल्याने पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कामांमध्ये अडथळा
ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने मागण्यांच्या पुर्ततेसाठी केलेल्या आंदोलनामुळे गावपातळीवरील विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. गावातील स्वच्छता, आरोग्यासह विविध कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांची कामेही अडून पडली आहेत.