आरक्षणासाठी नाभिक समाजाचा निवडणुकांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:14 AM2019-01-17T01:14:34+5:302019-01-17T01:15:55+5:30
नाभिक (न्हावी) समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा दाढी आणि कटींगचा असून दिवसाला शंभर ते दोनशे रुपयाचा सुध्दा व्यवसाय होत नाही. त्यामुळे हा नाभिक समाज आर्थिक परिस्थितीने अतिमागासलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नाभिक (न्हावी) समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा दाढी आणि कटींगचा असून दिवसाला शंभर ते दोनशे रुपयाचा सुध्दा व्यवसाय होत नाही. त्यामुळे हा नाभिक समाज आर्थिक परिस्थितीने अतिमागासलेला आहे. शासनाने आरक्षण न दिल्यास येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाभिक समाज हा आर्थिक परिस्थितीने अतिमागास असलेला आहे. त्यामुळे ज्या राज्यातील शासनकर्त्याना याची जाणीव झाली. त्या-त्या राज्यात नाभीक समाजाला आरक्षण देण्यात आले. आसाम, आंध्रप्रदेश, मेघालय, बिहार, उत्तरप्रदेशमध्ये अनुसूचित जाती, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, सिक्कीममध्ये आर्थिकदृष्ट्या अतिमागास जम्मू-कश्मीरमध्ये विशेष मागास अशा विविध राज्यात सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील शासनकर्त्याना नाभिक समाजाशी काहीच घेण-देण नसल्यामुळे १९८४ मध्ये केंद्र शासनातर्फे नाभिक समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती देण्यासंदर्भात पत्र येऊन सुध्दा येथील शासनकर्त्यानी ते पत्र केराच्या टोपलीत टाकले आहेत. महाराष्ट्रात नाभीक समाज अजूनही विना सवलतीने ओबीसी प्रवर्गातच जगत आहे. नाभिक समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी अनेकवेळा मोर्चे काढून शासनकर्त्याना अनुसूचित जाती सवलती मागणीचे पत्र देण्यात आले. परंतु कोणत्याही पक्षांच्या नेत्यांनी नाभिक समाजाचा विचार केला नाही. त्यासाठी गोंदिया जिल्हा नाभिक समाजाच्या कार्यकारीणीच्या बैठकीत १० जानेवारीला पुढील प्रत्येक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सोहन क्षीरसागर, प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने, माजी जिल्हाध्यक्ष राजुकमार प्रतापगडे, उपाध्यक्ष चेतन मेश्राम, सचिव सुरेश चन्ने, कोषाध्यक्ष घनश्याम मेश्राम, जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने, उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष सुशील उमरे, जिवा महल्ले समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रभान सूर्यकार, युवा संघटनेचे जिल्हा सचिव नुतनकुमार बारसागडे, गोंदिया तालुकाध्यक्ष भूमेश मेश्राम, तिरोडा तालुकाध्यक्ष प्रिती अनकर, आमगाव तालुकाध्यक्ष संतोष लक्षणे, महिलाध्यक्षा संगीता वाटकर, देवरी तालुकाध्यक्ष किशोर कावळे, सडक-अर्जुनी सलून संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर कावळे, गोंदिया तालुका उपाध्यक्ष प्रदीप लांजेवार, आलोक लांजेवार, चुन्नीलाल सूर्यवंशी, बंडू बारसागडे, ससेराज लांजेवार, शालीकराम बारसागडे, दुलीचंद भाकरे, महेश लांजेवार, सतीश साखरकर उपस्थित होते.