व्यसनमुक्तीसाठी ब्रह्माकुमारीज्चा पुढाकार
By admin | Published: January 22, 2016 02:48 AM2016-01-22T02:48:08+5:302016-01-22T02:48:08+5:30
विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता
गोंदिया : विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माझे गोंदिया- व्यसनमुक्त गोंदिया’ असे घोषवाक्य रूढ करून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती केली जाईल, अशी माहिती या संस्थेच्या व्यसनमुक्ती शाखेचे डॉ.सचिन परब यांनी गुरूवारी येथे पत्रकारांना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.परब यांनी सांगितले की, आता बहुतांश शिक्षक व्यसनाधीन झाले आहेत. काही जण तर विद्यार्थ्याच्या हातूनच खर्रा बोलवतात. यामुळे खर्रा, तंबाखूचे व्यसन करण्यात गैर काही नाही अशी विद्यार्थ्यांनी भावना होऊन ते सुद्धा अल्पवयात व्यसनाच्या आहारी जातात.
वास्तविक शाळा-महाविद्यालयांपासून १०० यार्डाच्या अंतरावर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करता येत नाही. पण कायद्याचे पालन कोणीही करीत नाहीत. बहुतांश लोकांना तर कायद्याची माहितीच नसते.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात सर्रास चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. खर्ऱ्याची बंदी सर्वत्र असली तरी खर्रा सहज मिळतो. केवळ कायदा करून होणार नाही किंवा दारूची विक्री बंद करून हे सर्व थांबणार नाही, त्यासाठी दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करून मागणी कमी केली जाऊ शकते. त्यासाठी राजयोगाच्या (मेडिटेशन) माध्यमातून कोणत्याही व्यसनापासून मनुष्याला परावृत्त केले जाऊ शकते, फक्त त्याची व्यसन सोडण्याची तयारी असली पाहीजे असे डॉ.परब यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि राज्याच्या शिक्षण विभागाकडून या संस्थेला शाळा-महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
या पत्रपरिषदेला बी.के.जयश्री बहन, बी.के.मीना बहन, बी.के.अलका बहन, गोंदियाच्या संचालिका बी.के.रत्नमाला बहन, तसेच विनोद हरिणखेडे, त्रिलोकचंद बग्गा, महेंद्र ठाकूर, जितेंद्र अग्रवाल, हरसूकभाई आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
वाढतेय वेगवेगळे व्यसन
४केवळ दारू किंवा तंबाखूचेच व्यसन नाही तर आजकाल मुलांमध्ये मोबाईल-इंटरनेटचेही व्यसन जडत आहे. यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त आहेत. त्यापासून त्यांना परावृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून शाळांनी-पालकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे डॉ.शेंडे म्हणाले.
युवकांना वाचवणे गरजेचे
४तंबाखूमुळे देशात दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आम्हाला कोणाचाही व्यवसाय बंद करायचा नाही, पण युवकांना वाचवायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये काऊन्सिलिंग केली जाणार असल्याची माहिती डॉ.परब यांनी दिली. यात नंतर परिणामकारक शाळांना व्यसनमुक्त शाळा म्हणून घोषित केले जाईल.