ब्रेक टेस्ट ट्रॅक अभावी करावा लागेल १०० किमीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:08 PM2018-05-13T21:08:10+5:302018-05-13T21:08:10+5:30
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र यानंतरही राज्यातील ३२ कार्यालयांकडे हे ट्रॅक उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र यानंतरही राज्यातील ३२ कार्यालयांकडे हे ट्रॅक उपलब्ध नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून राज्यातील ट्रॅक नसलेल्या कार्यालयांपैकी पाच कार्यालय वगळता २७ कार्यालयात वाहन तपासणी बंद करण्यात आली आहे. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक च्या कामाला अद्यापही सुरूवातही न झाल्यामुळे येथील वाहनधारकांना वाहनाची तपासणी करण्यासाठी १०० किमी अंतरावर असलेल्या भंडारा किंवा त्यापेक्षाही जास्त अंतर असलेल्या मौदा येथे जावे लागणार आहे.
गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे जागा देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील २७ कार्यालयांना १ नोव्हेंबर ही तारीख दिली होती.
गोंदिया जिल्ह्याला सुरूवातील ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु सहा महिन्याचा कालावधी लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरपार येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या कामाला सुरूवात केली नाही. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील जड वाहनांना भंडारा किंवा नागपूर जिल्ह्यात पाठवावे लागणार आहे.
प्रत्येक प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील ४० कार्यालयाकडे २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारणीकरिता जागा उपलब्ध करुन दिली आहे. सदर ट्रॅक बांधण्याकरिता प्रशासकीय मान्यता दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १४ सप्टेंबर २०१७ च्या आदेशानुसार सांगली, गोंदिया, अकलुज, सातारा आणि ठाणे या पाच कार्यालयांना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत २५० मीटर लांबीचा ब्रेक टेस्ट ट्रॅक पूर्ण करण्याची मूभा दिली होती. त्यानंतर ३० जून २०१८ ही मुदत देण्यात आली. त्यामुळे तेथील वाहन तपासणी तोपर्यंत त्यांच्याच कार्यालयात सुरू आहे. राज्यातील २७ कार्यालयांमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅकचे बांधकाम ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यत पूर्ण झाले नाही त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण चाचणी या कार्यालयांमध्ये बंद करण्यात आली.
जागा उपलब्ध असूनही कामाला सुरूवात नाही
सुरूवातीला ब्रेक टेस्ट ट्रॅक गोरेगाव तालुक्यात तयार करण्यात येणार होते. मात्र ती जागा झुडपी जंगल व गायरान राखीव असल्यामुळे ह्या जागेसंदर्भात कार्यवाही करता आली नाही. त्यानंतर गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथील १.४० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्यास मंजुरी देण्यात आली. ह्या ट्रॅकच्या निर्र्मितीसाठी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३० जून ही मुदत देण्यात आली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग टेंडर प्रक्रियेत अडकले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जड वाहनांना भंडारा किंवा नागपूर जिल्ह्यात तपासणीसाठी जाण्याची वेळ येऊ शकते.
मुख्य अभियंत्याकडे तक्रार
ब्रेक टेस्ट ट्रॅक करीता शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजुर केला.जागाही उपलब्ध करून देण्यात आली.परंतु गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या ब्रेक टेस्ट ट्रॅक कामाला सुरूवात न केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील जड वाहनांच्या तपासणीसाठी भंडारा किंवा नागपूर जिल्ह्यात पाठवावे लागणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नागपूर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.