रुग्णवाढीला ब्रेक, पण काळजी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:51+5:302021-09-23T04:32:51+5:30
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येला बुधवारी (दि.२२) ब्रेक लागला. बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या ...
गोंदिया : मागील दोन-तीन दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येला बुधवारी (दि.२२) ब्रेक लागला. बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शून्य होती. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या स्थिर होती. रुग्ण संख्या जरी स्थिर असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांची काळजी कायम आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ४२७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३८० नमुन्यांची आरटीपीसीआर तर ४७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुुषंगाने आतापर्यंत ४५२४८५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३१९३६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२०५४९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२२० नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५०४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ९ ॲक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक ५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहे. कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसून जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तर कोरोनाला लवकर जिल्ह्यातून हद्दपार करणे शक्य आहे.
............
मास्कचा करा नियमित वापर
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. संसर्ग आटोक्यात आल्याचे समजून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मात्र, असे करणे नागरिकांसाठीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नियमांचे पालन, मास्कचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.
...........
लसीकरणाची दहा लाखांकडे वाटचाल
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात विदर्भात जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ८२ हजार ६३५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ७१२०५७ नागरिकांनी पहिला तर २७०५७८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.