लोकार्पणापूर्वीच इमारतीची भिंत फोडण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 09:43 PM2019-07-10T21:43:57+5:302019-07-10T21:44:50+5:30
विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध शासकीय विभागांचे कार्यालय एकाच इमारतीत आणण्यासाठी येथील जयस्तंभ चौका लगत कोट्यवधी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. या इमारतीचे अद्यापही लोकार्पण व्हायचे आहे. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने भिंती फोडण्याची वेळ आली. लोकार्पणापूर्वीच ही स्थिती निर्माण झाल्याने बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
जयस्तंभ चौक परिसरातील जुने तहसील कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीत शहरात विविध ठिकाणी सुरू भाड्याच्या इमारतीत सुरू असलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी व नागरिकांची पायपीट दूर करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र इमारत बांधकामात काही त्रृट्या राहिल्याने ही इमारत सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. या इमारतीचे लोकार्पण व्हायचे असले तरी या इमारतीत आठ ते दहा विभागाची कार्यालये आली आहेत. इमारतीत ७२ विविध शासकीय विभागासाठी कार्यालये सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी फर्निचर सुध्दा देण्यात आले. मात्र हे फर्निचर सुध्दा निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला होता.
अद्यापही या इमारतीत ६० हून अधिक विभागाची शासकीय विभागाची कार्यालये यायची आहेत. मात्र त्यापूर्वीच इमारतीची पाईप लाईन चोक झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला इमारतीची भिंत फोडावी लागली. तीन चार ठिकाणी पिलरची भिंती फोडून पाईप लाईन दुरूस्तीचे काम सोमवारी करण्यात आले.
दरम्यान या प्रकारामुळे इमारत बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण होण्यापूर्वीच ही स्थिती असून सर्व विभागाची कार्यालये या इमारतीत आल्यानंतर काय स्थिती राहिल असा सवालही उपस्थित केला जात आहे.
इमारतीचे फायर आॅडिट नाही
मुंबई येथील मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर सर्वच शासकीय इमारतीचे सुरक्षेच्या दृष्टीने फायर आॅडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र या आदेशाला शासनाच्या विविध विभागांकडून खो दिला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फायर आॅडिटच करण्यात आले नसल्याची बाब पुढे आली आहे. याला गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने सुध्दा दुजोरा दिला आहे. त्यामुळे या नवीन इमारतीत एखाद्या वेळेस आगीची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फायर एस्टींग्युशर मुदतबाह्य
नवीन प्रशासकीय इमारतीत सुरक्षेच्या दृष्टीने फायर एस्टींग्युशर लावण्यात आले आहे. मात्र ते सुध्दा मुदतबाह्य झाले असून अद्यापही त्यांची रिफीलींग करण्यात आली नाही. या इमारतीत सध्या उपविभागीय कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय,भूमिअभिलेख विभाग, कृषी विभागाचे कार्यालय सुरू झाले आहे. मात्र यानंतरही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वर्चस्वाच्या लढाईत लोकार्पण लांबणीवर
नवीन प्रशासकीय इमारतीचे संपूर्ण बांधकाम होऊन इमारत सुसज्ज झाली आहे. या ठिकाणी चार ते पाच विभागाची कार्यालय सुध्दा आली आहेत. मात्र यानंतरही या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नाही. यामागील कारण दोन राजकीय पक्षातील वर्चस्व आणि श्रेयाची लढाई असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळेच लोकार्पणाचा मुर्हुत निघत नसल्याची माहिती आहे.