बस स्थानकावर श्वास गुदमरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:16 AM2017-07-24T00:16:22+5:302017-07-24T00:16:22+5:30
येथील जयस्तंभ चौकातील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे.
उभे राहणे कठीण : प्रवासी घेतात दुकानांचा आसरा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जयस्तंभ चौकातील बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंध पसरला असून तेथे उभे राहणे अशक्य झाले आहे. प्रवासी एकतर नाक दाबून किंवा लगतच्या दुकानांत उभे राहून गाडीची वाट बघत असतानाचे चित्र बघावयास मिळत आहे.
शहरातील जयस्तंभ चौकातील बसस्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. त्यात विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी येथे हमखास बघावयास मिळते. आमगाव व गोरेगाव मार्गाकडे जाणारे प्रवासी येथूनच आपली बस धरतात. मात्र आजघडीला हे बस स्थानक बस स्थानक राहिलेले नसून एखाद्या गोठ्या सारखे दिसत आहे. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यातून दुर्गंध पसरला असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना नाक दाबून उभे रहावे लागत आहे.
एवढेच नव्हे तर काही प्रवासी लगतच्या दुकानांत उभे राहून बसची वाट बघतानाही दिसतात. बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुकानी थाटण्यात आल्या आहेत. त्यांचाच कचरा येथे टाकला जात असावा असे दिसून येते. मात्र कचऱ्याची उचल करण्याक डे नगर परिषदेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारच येथे लागले आहे. आता पावसाळा असून कचरा कुजल्यामुळे त्यातून दुर्गंध पसरला आहे. परिणामी येथे उभे राहिल्यास श्वास गुदमरत आहे.