लाचखोर रोजगार सेवक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:20 PM2018-04-09T21:20:23+5:302018-04-09T21:20:23+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलाच्या कामावर काम केल्याचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून बिल काढून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभेलाल मोतीलाल मोहारे (६२) असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुलाच्या कामावर काम केल्याचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून बिल काढून देण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शोभेलाल मोतीलाल मोहारे (६२) असे लाचखोर रोजगार सेवकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदारांच्या आईच्या नावाने सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. रोजगार हमी योजनेंतर्गत या घरकुलाचे काम असल्याने तक्रारदार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केले.
बांधकाम पूर्ण झाल्याने कुटुंबातील सदस्यांच्या नावाचे हजेरीपट पंचायत समितीत पाठवून १८ हजार रूपयांचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदाराने १ एप्रिल रोजी रोजगार सेवक मोहारे याला विचारणा केली. मात्र मोहारे याने काम करून देण्यासाठी एक हजार रूपयांची मागणी केली.
यावर तक्रारदाराने २ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने त्याच दिवशी ग्राम पानगाव येथे पडताळणी केली.
यात मोहारे याने हजेरीपट पंचायत समितीत पाठविण्यासाठी ३०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावर मोहारे विरूद्ध सोमवारी (दि.९) सालेकसा पोलीस ठाण्यात लाप्रका कमल ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.