लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!

By अंकुश गुंडावार | Published: September 20, 2024 11:41 PM2024-09-20T23:41:50+5:302024-09-20T23:42:46+5:30

वनमजुराच्या माध्यमातून स्वीकारली रक्कम

Bribe forest guard caught in ACB's net; Bribe of five thousand rupees | लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!

लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!

गोंदिया: वन जमिनीवर अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई न करण्यासाठी वनमजुराच्या माध्यमातून पाच हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत दल्ली गावा जवळील जंगलात शुक्रवारी (दि.२०) ही कारवाई करण्यात आली. तुलसीदास प्रभुदास चौहान (३४) असे वनरक्षक तर देवानंद चपटू कोजबे (५८) असे लाचखोर वनमजुराचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार (४६,रा.भोंडकीटोला) यांची शेती दल्ली शिवारात वन जमीन लगत असून दोन आठवड्यापुर्वी त्यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमीन साफसूफ केली होती. यावर १३ सप्टेंबर रोजी तुलसीदास चौहान याने त्यांना फोन करून सडक-अर्जुनी येथे बोलावून शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरता २० हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाच मागणी पडताळणी दरम्यान चौहान याने पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यावर पथकाने शुक्रवारी (दि.२०) सापळा लावला असता चौहान याच्या सांगण्यावरून वनमजूर कोजबे याने लाच रकमेतील लाचेचा पहिला हप्ता असे पाच हजार रूपये तक्रारदाराकडून स्वीकारले. यामुळे दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन डुग्गीपार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Bribe forest guard caught in ACB's net; Bribe of five thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.