लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला जाळ्यात
By कपिल केकत | Published: August 4, 2023 02:17 PM2023-08-04T14:17:52+5:302023-08-04T14:20:14+5:30
खासगी व्यक्ती मार्फत घेतली लाच : कुक्कुटपालन योजनेंतर्गत अनुदान काढून देण्यासाठी मागणी
गोंदिया : कुक्कुटपालन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी खासगी व्यक्ती मार्फत १० हजार रूपयांची लाच घेणारा पशुधन विकास अधिकारी व त्याचा साथीदार जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ३) शहरातील गोरेलाल चौकात ही कारवाई केली आहे. जयंतप्रकाश ईश्वरदास करवडे (३९,रा. तिरोडा) असे लाचखोर पशुधन विकास अधिकारी तर महेंद्र हगरू घरडे (५०, रा. चुटीया) असे दोघा लाचखोरांचे नाव आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी (४२,रा. गोंदिया) यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत १००० मांसल कुक्कुट पक्षीगट योजनेंतर्गत शेड उभारून कोंबड्यांची पिल्ले खरेदी करून व्यवसाय सुरू केला. योजनेंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा ६८५०० रूपयांचा पहिला हप्ता तक्रारदारास मिळाला असून अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचा एक लाख रूपयांचा धनादेश काढून देण्यासाठी जयंतप्रकाश करवडे याने फिर्यादीला १२ हजार रूपयांची मागणी केली. तर तडजोडीअंती ११ हजार रूपयांची मागणी करून १० हजार रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखविली व उर्वरित एक हजार रूपये धनादेश मिळाल्यानंतर देण्याची मागणी केली. तसेच गुरूवारी (दि.३) लाचेचे १० हजार रूपये महेंद्र हरडे यांच्यामार्फत शहरातील गोरेलाल चौकात स्वीकारले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेच्या रकमेसह महेंद्र हरडे व त्यानंतर जयंतप्रकाश करवडे यांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोनि. उमाकांत उगले, पोनि. अतुल तवाडे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, हवालदार संजय बाहेर, मंगेश काहालकर, शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवाने, महिला शिपाई संगीता पटले, चालक शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.