नवरदेव लग्न मंडपात आलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:16+5:302021-03-05T04:29:16+5:30
तिरोडा : तालुक्यातील मारेगाव येथील एका युवतीचा विवाह तालुक्यातीलच सोनेखारी येथील रहिवासी पंढरी इळपाते यांचा मुलगा रामरतन इळपाते याच्याशी ...
तिरोडा : तालुक्यातील मारेगाव येथील एका युवतीचा विवाह तालुक्यातीलच सोनेखारी येथील रहिवासी पंढरी इळपाते यांचा मुलगा रामरतन इळपाते याच्याशी ठरला होता. त्यानुसार २८ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता विवाह होणार होता. पण लग्नाच्यावेळी नवरदेव लग्न मंडपातच आला नाही. त्यामुळे वधू पक्षाची चांगलीच धावपळ उडाली होती. त्यामुळे वधू पक्षाने याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे.
प्राप्त माहितीनुसार लग्न जुळले तेव्हापासून वराचे कुटुंबीय विविध कारणांवरुन वधू पक्षाला त्रास देत होते. पैशाची मागणी करीत होते. वधूच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे वधूच्या आईला पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप वधू पक्षाने केला आहे. लग्नाच्यादिवशी माहिती घेतली असता, वराकडील मंडळींनी लग्नाची कोणतीही तयारी केलेली नव्हती. दुपारी ३ वाजेपर्यंत नवरदेवाची वाट पाहून अखेर वधू पक्षाने तिरोडा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. वधूच्या तक्रारीवरून रामरतन पंढरी इळपाते, चंद्रकला पंढरी इळपाते, पंढरी इळपाते, लीलाधर चांदेवार, बबिता लीलाधर चांदेवार यांच्यावर हुंडाबंदी अधिनियम १९६१ कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित वधूला न्याय मिळावा म्हणून कुटुंबीय, नातेवाईक मारेगाव येथील गावकऱ्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.