कोरणी-काटी रस्त्यावरील पुलालाही पडले खड्डे
By admin | Published: July 27, 2014 12:12 AM2014-07-27T00:12:00+5:302014-07-27T00:12:00+5:30
जवळच असलेल्या कोरणी-काटी रस्त्यावरील ५ कोटी रुपये खर्च करून भाद्याटोला गावाला जोडणारा पूल तयार करण्यात आला. या पुलाचे लोकार्पण गेल्या १२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ
गोंदिया : जवळच असलेल्या कोरणी-काटी रस्त्यावरील ५ कोटी रुपये खर्च करून भाद्याटोला गावाला जोडणारा पूल तयार करण्यात आला. या पुलाचे लोकार्पण गेल्या १२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. परंतू या पुलाच्या काठालाही खड्डे पडत सून तो भाग खचून जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. माती खचून वाहून गेली आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता तयार केलेला हा पूल आता नागरिकांसाठी धोकादायक झाला आहे. ही बाब काही सूज्ञ नागरिकांच्या लक्षात आली. उद्घाटनाच्या आठ दिवसानंतरच सदर पुलाच्या दोन्ही बाजूंची माती वाहून गेल्याने पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलावरील दोन्ही बाजूकडील रस्ता पाण्यात वाहून जाण्याची दाट शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
या पुलाच्या बांधकामात अधिकारी-लोकप्रतिनिधींनी संगनमत केल्याचा व हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली. यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरत आहे.