वाढत्या रहदारीने पुलांना अकाली वृद्धत्व!
By admin | Published: August 5, 2016 01:28 AM2016-08-05T01:28:39+5:302016-08-05T01:28:39+5:30
जिल्ह्यातूून जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत.
ओव्हरलोड वाहनांची वर्दळ : ठेंगण्या रपट्यांची उंची वाढविण्याची गरज
गोंदिया : जिल्ह्यातूून जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत. हे सर्व पूल अलिकडच्या ५० ते ६० वर्षातील आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या यापैकी एकही पूल मुदतबाह्यकिंवा धोकादायक स्थितीत आलेला नाही. मात्र गेल्या ५० वर्षात वाढलेला रहदारीचा भार, जड वाहनांची वर्दळ पाहता अनेक पूल मुदतीपूर्वीच जर्जर होण्याच्या स्थितीत आले आहेत.
महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल अचानक तुटून काही वाहने नदीत वाहून गेल्याने राज्यभरातील बांधकाम यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रस्ता आणि रेल्वेमार्गावरील पूल किती सुरक्षित आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. जिल्ह्यात राज्य सरकारच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर १६ मोठे तर २५६ लहान पूल आहेत. मात्र यापैकी एकही पूल मुदतबाह्य किंवा धोकादायक नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी काही जुन्या पुलांच्या डागडुजीची गरज आहे. हे काम अधूनमधून सुरू असते. जड वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे त्या पुलांचे आयुष्य कमी होत आहे. अकाली वृद्धत्वाकडे त्या पुलांची वाटचाल सुरू आहे.
पुलांना वर्दळीचा फटका
देवरी : तालुक्यात ब्रिटीशकालीन पूल एकही नसला तरी नंतर निर्माण झालेल्या पुलांची संख्या डझनभर आहे. या रूंद-अरुंद पुलांवरून दिवसेंदिवस वाहतुकीचा भार वाढतच आहे. या पुलावरून तालुक्यात ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सगळेच पूल जीर्ण होत आहेत. याबाबत शासनाने वेळीच गंभीर होणे गरजेचे झाले आहे.
देवरी ते आमगाव मार्ग वर्दळीचा आणि सर्वात महत्वाचा राज्य महामार्ग क्रमांक २७६ आहे. या महामार्गावर दररोज शेकडो ओव्हरलोड छोटी-मोठी वाहने ये-जा करीत असतात व याच मार्गावर देवरीपासून १ किमी अंतरावर भागीजवळ असलेला पूल व डवकी नाल्याचा पूल हे ५० वर्षापूर्वीचे आहेत. सद्यस्थितीत त्यांची परिस्थिती बिकट आहे. हे पूल जास्त उंच नसल्याने पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी जाते व रहदारीसुध्दा दोन-दोन दिवस बंद राहते. ५० वर्षापूर्वीच्या वाहतुकीचा अंदाज घेऊन पूल बांधण्यात आले होते. परंतु आजची स्थिती पाहता दर मिनीटाला ४० ते ५० छोटी-मोठी ओव्हरलोड वाहने त्यावरून जात असतात.
हीच अवस्था देवरी-चिचगड-ककोडी मार्गावरील छोट्या नाल्यावरच्या पुलांची आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाही पुलाचे अजूनपर्यंत आॅडीट करण्यात आले नाही. जीर्ण झालेल्या या पुलांवर केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते. महाडमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर आतातरी प्रशासन जागे होवून तालुक्यातील जीर्ण झालेल्या पुलांकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत.
कोलकाता रेल्वेलाईन धोक्यात
सालेकसा : सालेकसा तालुक्यातून वाघ नदी वाहते. ही जिल्ह्यातील एक मोठी नदी आहे. या नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. त्याच बरोबर मुंबई-हावडा रेल्वे मार्गही या नदीवरून गेला आहे. वाघ नदीवर धानोली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रेल्वेचा पूल आहे. तो शतकी ओलांडून मुदतबाह्य झाला आहे. त्यामुळे रेल्वेला त्या पुलाच्या पुननिर्मिर्तीबद्दल विचार करणे गरजेचे झाले आहे.
रेल्वे मार्गाखालील नदी-नाल्यांवर बांधलेले सर्व पूल मुदतबाह्य झाले आहेत. प्रत्येक पुलाची मुदत १०० वर्षाची होती. आता त्या पुलांनी १२५ ते १५० वर्षे ओलांडली आहेत. रेल्व विभागाने पुलाखाली लोखंडी अँंगल व खांबाचा आधार देत त्याच पुलाचा वापर सुरू ठेवला आहे. ८-१० वर्षापूर्वी दर्रेकसानजीक बोगद्याजवळ रेल्वे पूल कोसळला होता. त्यावेळी तेथून मालगाडी जात होती. पूल कोसळताना मालगाडी थोडक्यात बचावून पुलावरच अधांतरी होती. नंतर तिथे नवीन पूल तयार करण्यात आला. शासनाने इतर पुलांबद्दल वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
रस्ता मार्गावरील सर्व पुलांची निर्मिती ५० वर्षाच्या आतील असल्यामुळे सध्या त्या पुलांबद्दल असुरक्षितता दिसून येत नाही. तरीसुध्दा बांधकाम विभागाने व परिवहन विभागाने वेळोवेळी महत्वाच्या व सतत रहदारीच्या पुलांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. वाघ नदीवरील सर्वात मोठा पुल सालेकसा-आमगाव बस मार्गावर साकरीटोलानजीक आहे. त्या पुलाची उंची जास्त असल्यामुळे वाघ नदीला कितीही पूर आला तरी पुलावरून पाणी जाण्याची चिंता नसते. या पुलाची निर्मिती जवळपास ४२ वर्षापूर्वी झाली आहे. मात्र तो पूर्णपणे सुरक्षित आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)