दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:17 AM2018-07-11T00:17:52+5:302018-07-11T00:18:54+5:30

जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही.

Bring the Divya into the mainstream | दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : सामाजिक न्याय भवनात दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही. यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचे प्रमाण शून्य टक्के करण्याचा निर्धार केला आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शून्य टक्के प्रमाण या विशेष मोहिमेंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होत्या. या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य छाया दसरे व विजय लोणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले म्हणाले, राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे १०० टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य वापर करणे सुरु असून निश्चितच बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याच्या यशस्वितेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तयार झाल्यामुळे त्यांना आता संजय गांधी निराधार योजना, अपंग शिष्यवृत्ती, रेल्वे, एस.टी. सवलत, रमाई घरकूल, अपंग विवाह अनुदान, कृत्रिम अवयव व साहित्य आदी शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीचे झाले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याचा हा अभिनव यशस्वी प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रात सुध्दा राबविण्याचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी जि.प. समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मनोगत व्यक्त करून दिव्यांग बांधवांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रूखमोडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसूदन धारगावे, डॉ.अशोक चौरसीया, डॉ.राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्यासह दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक अभिजीत राऊत यांनी मांडले. संचालन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके व आभार समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.
मिशन झिरो पेंडन्सी अंतर्गत ३५०० जणांना लाभ
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र १०० टक्के वाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ दरम्यान विशेष मोहीम राबवून मिशन झीरो पेंडन्सी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३५०० लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला व हा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Web Title: Bring the Divya into the mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.