शहराला स्वच्छतेत अग्रस्थानी आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:16 PM2018-10-01T21:16:32+5:302018-10-01T21:16:50+5:30

तिरोडा शहर स्वच्छ व सुंदर बनावे हे माझे ध्येय असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी मी कधीही मागे हटणार नाही. नगराध्यक्षा पदावर आल्यापासून शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Bringing the city to cleanliness | शहराला स्वच्छतेत अग्रस्थानी आणणार

शहराला स्वच्छतेत अग्रस्थानी आणणार

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाली देशपांडे : चांगल्या कामाची प्रसिद्धी झाली पाहिजे, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तिरोडा शहर स्वच्छ व सुंदर बनावे हे माझे ध्येय असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी मी कधीही मागे हटणार नाही. नगराध्यक्षा पदावर आल्यापासून शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचेच फळ म्हणजे मागील वर्षी २०१८ मध्ये तिरोडा शहराच्या संपूर्ण भारतामधून स्वच्छवतेच्या बाबतीत ८१ वा क्रमांक लागलेला होता तो आता ५० च्या आत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ चे नोडल अधिकारी नागेश लोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
नगराध्यक्षा म्हणाल्या, शहरातील ओला कचरा व सुखा कचरा हा वेगवेगळा जमा व्हावा यासाठी शहरातील ३५२२ बीपीएल कुटुंबाना प्रत्येकी दोन डस्टबीन देण्याचे ठरले असून लवकरच आमदारांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबरला संपूर्ण शहरात स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात येईल. शहरातील हॉटेल, दुकानदार, पानटपरी, चायनिज यांना डस्टबिन ठेवणे आवश्यक असून दुकानासमोर कचरा दिसल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेशही याप्रसंगी न.प. अधिकारी, कर्मचारऱ्यांना दिले असल्याचे सांगितले.स्वच्छता कार्यक्रमात श्रमशक्ती तसेच आयसीसी क्रिकेट क्लबचे सहकार्य मिळत असल्याचे सांगून विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, महिला बचत गट, लायनेस क्लब, लोकमत सखी मंच यांचेही सहकार्य घेणार असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर घर ते घर कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहे. हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक, सामुदायिक, वैयक्तिक शौचालयावर निधी खर्च करणे आदी कामे केली जात आहे. कचरा संकलन करताना तो ओला व सुका वेगळ्या स्वरुपात गोळा करुन घंटा गाडीवर जमा करणे, उघड्यावर शौचास न जाणे, सार्वजनिक, सामूदायिक, वैयक्तिक शौचालयाचा वापर करताना स्वच्छतेच्या सवयी लावणे आवश्यक असल्याचे सांगितले.
स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. हे शहर माझे आहे, अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असावी व त्यानुसार स्वत:पासून स्वच्छतेची कास प्रत्येकानी धरल्यास तिरोडा शहर कचरामुक्त स्वच्छत व सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी केले.

Web Title: Bringing the city to cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.