शोषित-वंचितांना मुख्य प्रवाहात आणणार
By admin | Published: March 31, 2017 01:27 AM2017-03-31T01:27:40+5:302017-03-31T01:27:40+5:30
गावातील गरजू लाभार्थी शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
नाना पटोले : ४८ लाभार्थ्यांना वनविभागाच्यावतीने गॅस वाटप
बोंडगावदेवी : गावातील गरजू लाभार्थी शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. महिला-भगिनींना आरोग्याचा, चुलीतील धुराचा त्रास कमी व्हावा म्हणून वनविभागामार्फत गॅस वाटप केले जात आहे. सन २०१९ पर्यंत गावातील कोणताही गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही. समाजातील प्रत्येक शोषित-वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त वतीने सार्वजनिक रंगमंदिरात गॅस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नवेगावबांधचे प्रकष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे होते. अतिथी म्हणून तहसीलदार डी.सी. बोंबार्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, इण्डेन गॅसचे संचालक अशोक चांडक, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष देवलाल मानकर, सचिव रत्नाकर बोरकर, माजी पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे उपस्थित होते.
खा. पटोले पुढे म्हणाले, गावचा सर्वागिण विकास साधण्यासाठी गावाला जोडणारे रस्ते उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. गावात होणाऱ्या विकास कामाचा निधी हा समस्त जनतेचा आहे. त्या निधीचा योग्य उपयोग होतो काय, याकडे ग्रामस्थांना लक्ष देणे गरजेचे आहे. बीपीएल असो वा नसो आता यापुढे गरजवंतांना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणताही व्यक्ती राहत्या घरापासून वंचित राहणार नाही. गावकऱ्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. जे लोक अन्नधान्यापासून वंचित होते त्यांनाही आज अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले.
तहसीलदार बोंबार्डे यांनी, पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. वनविभागाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या गॅस वाटपाने महिलांचे आरोग्य निश्चित चांगले राहील, असा आशावाद व्यक्त केला. उदापुरे यांनी, दिवसेंदिवस वनाची संख्या कमी होत आहे. जंगलतोड राहिली तर वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या गावाजवळचे जंगल सुरक्षीत राहावे, लाकडे जाळली जावू नये म्हणून गॅस कनेक्शनचे वाटप केले जात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
ठाणेदार बंडवार यांनी, वनविभागाच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. याप्रसंगी गावातील अनुसुचित जातीच्या ४८ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे यांनी ओबीसी लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यासाठी कार्यवाहीची मागणी मांडली. संचालन वन समितीच्या उपाध्यक्ष दीपिका गजभिये यांनी केले. आभार वन समितीचे सचिव तथा क्षेत्र सहाय्यक धुर्वे यांनी मानले.
याप्रसंगी वन समितीच्यावतीने खा. नाना पटोले, तहसीलदार बोंबार्डे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी उदापुरे, ठाणेदार नामदेव बंडगर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.