पायी चालण्याची सवय मोडली; नको त्या वयात गुडघा-कंबरदुखी लागली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:45+5:302021-09-24T04:34:45+5:30
कपिल केकत गोंदिया : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत प्रत्येकाचे जीवन आरामदायी झाले असून कोणतेही काम करावयाचे असल्यास त्यासाठी मशीन ...
कपिल केकत
गोंदिया : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत प्रत्येकाचे जीवन आरामदायी झाले असून कोणतेही काम करावयाचे असल्यास त्यासाठी मशीन आहे. घराजवळ एखाद्या कामासाठी जायचे असले तरीही त्यासाठी गाडीचा वापर केला जात आहे. पायी फिरणे व शरीराकडून मेहनतीची कामे कुणी करत नसल्याने शरीराचे वजन वाढत चालले आहे. उन्हात निघणे टाळले जात असून त्यामुळे व्हिटामिन-डी मिळत नाही व हाडे कमजोर होत आहेत. वाढते वजन व त्यात व्यायामाचा अभाव यामुळे वृद्धांना तर सोडाच मात्र तरुणाईतच गुडघे व कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे. यासाठी दररोज पायी चालणे व व्यायामाची गरज आहे.
-----------------------------
१) या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षामिळेपर्यंत
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली
तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत
-----------------------------
२) म्हणून वाढले हाडांचे आजार
दररोज पायी फिरणे, नियमित व्यायाम, उन्हात निघून व्हिटामिन-डी घेणे, पौष्टिक आहार या सर्वच बाबींकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. शिवाय प्रत्येकाचे वजन वाढले असून हाडे कमजोर होत आहेत. यामुळेच आतापासूनच हाडांचे त्रास जाणवू लागले आहेत. यावर एकच उपाय असून नियमित पायी चालणे, व्यायाम व उन्हात निघणे गरजेचे आहे.
---------------------
३) हे करून पाहा (पॉईंटर्स)
एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा
कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या
घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा
------------------------------
पायी चालताना त्रास होत असल्यास सायकलिंग करा
सायकलिंगपेक्षा चांगला व्यायाम नाही असे बोलले जात असून डॉक्टर्सही सायकलिंग करण्याचा सल्ला देतात. आता मात्र प्रत्येकच कामासाठी गाडीचा वापर होत असून शरीराचे वजन वाढत आहे. अशात गुडघेदुखीचा त्रास वाढत चालला आहे व त्यामुळे कित्येकांना पायी चालणेही कठीण होत आहे. अशा व्यक्तींनी सायकलिंग करणे गरजेचे असल्याचे हाडरोग तज्ज्ञ डॉ. अभिषेक भालोटिया यांनी सांगितले.