खरीपाच्या तोंडावर बोगस बियाणे बाजारपेठेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:01 PM2019-05-27T22:01:52+5:302019-05-27T22:02:08+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहे. तसेच हंगामात वेळेवर गोंधळ उडू नये यासाठी खते, बियाणे यांची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. मात्र लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याचीे शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यात बियाणे, खते यांचाही समावेश आहे. दरवर्षी जिल्ह्यात बियाण्यांमध्ये शेतकºयांची फसगत होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.
बियाण्यांचा काळाबाजार थांबावा व शेतकºयांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाने जिल्हा आणि तालुका पातळीवर भरारी पथके तयार केली आहे. मात्र यानंतरही बोगस बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याची माहिती आहे. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातून बोगस बियाण्यांचा काळाबाजार होत असल्याचे कृषी विभागाने समोर आणले. नागपूर येथे विक्रीला जाणाºया बोगस बियाण्यांचा व्यापार करणाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे.
बोगस बियाण्यांची तस्करी मध्यप्रदेशातून नागपूरात होत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्यप्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाºया एकाकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले.त्यांच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा परिषदेचा कृषी विभागाकडून तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकºयांना अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येतात. यामध्येही शेतकºयांना बोगस बियाण्यांचे वाटप होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे.लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, शिवणी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे तयार करुन हे बियाणे पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात विक्रीला येत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे कृषी विभागाने बोगस बियाण्यांच्या काळा बाजारावर नियंत्रण ठेवून शेतकºयांना दर्जेदार बियाणे कसे मिळतील?यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे.