भाऊ पैसा नव्हे प्रतिबंधात्मक लसच येणार कामी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:11+5:302021-09-14T04:34:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही नागरिक पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवत असल्याने फक्त १६ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे दिसत आहे. मात्र हा प्रकार अनुचित असून, दुसऱ्या लाटेने पैसा नाही तर कोरोनाची लस कामी आल्याचे दाखवून दिले आहे.
देशात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हाती काहीच नव्हते व कित्येकांचा कोरोनाने जीव घेतला. मात्र याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे, दुसरी लाट आली तेव्हा अवघ्या देशातच कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली होती. मात्र लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाला आपले पाय पसरायला संधी मिळाली. यामुळेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिकच धोक्याची ठरली. यानंतर शास्त्रज्ञांनी कोरोनाला पाय पसरू द्यायचे नसल्यास लवकरात लवकर लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर लसीकरणाला अधिक गती देण्यात आली असून, लसीकरण जोमात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कहर बघता नागरिकांनी लसीकरणासाठी धावपळ सुरू केली व ती सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६७.६१ टक्के लसीकरण झाले आहे, यात ८,७८,६८३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये ५०.८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, त्यांची ६,६०,६५७ एवढी संख्या आहे. तर फक्त १६.७८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, त्यांची संख्या २,१८,०२६ एवढी आहे. यावरून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने पहिला डोस घेतला व आता दुसरा डोस घेण्यासाठी त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.
----------------------------------
तिसरी लाट नको असल्यास दुसरा डोस घ्या
दुसऱ्या लाटेतील कहर आजही धडकी भरवणारा असून, त्याच भीतीने नागरिकांनी लसीकरणासाठी धाव घेतली होती. यात त्यांनी पहिला डोस घेतला व त्यानंतर आता जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असल्याने ‘आता कोरोनाच नाही तर डोसची काय गरज’ अशा संभ्रमात नागरिक वावरत आहेत. मात्र, दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याचे कित्येक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शिवाय नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता ऑक्टोबरमध्येच दुसरा डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
-----------------------------
दुसऱ्या लाटेतून मिळाली शिकवण
दुसऱ्या लाटेत कित्येकांना गंभीर स्थितीत दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली. मात्र त्यानंतरही त्यांचा जीव गेला. यात कित्येक धनाढ्यांचाही समावेश असून, पैसा असतानाही त्यांना वाचवता आले नाही. तोच ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोना गंभीर स्थितीपर्यंत नेऊ शकला नाही, हे अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. यामुळे दुसऱ्या लाटेने आजच्याघडीला पैसा नाही तर फक्त लस कामी येणार असल्याचे दाखवून दिले आहे. याकरिता लवकरात लवकर लसीकरण हाच कोरोनाला मात देण्याचा रामबाण इलाज आहे.