भाऊ अनलॉक झाले आता झेडपीची निवडणूक केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:33+5:302021-06-10T04:20:33+5:30

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. मात्र ...

Brother unlocked now when ZP election | भाऊ अनलॉक झाले आता झेडपीची निवडणूक केव्हा

भाऊ अनलॉक झाले आता झेडपीची निवडणूक केव्हा

Next

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले. तसेच शासनाने सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे गोंदिया जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकासुध्दा लांबणीवर गेल्या होत्या. मात्र अनलॉक झाले असून निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यातील चावडीवर भाऊ अनलॉक झाले आता निवडणुका केव्हा अशी चर्चा म्हणून रंगू लागली आहे.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या हे दोन्ही महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणृूक लढवून अनेकजण राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असतात. जिल्हा परिषद निवडणूक ही त्यासाठीच महत्त्वपूर्ण समजली जाते. अनेक जिल्हा परिषद सदस्य पुढे आमदार झाल्याचे जिल्हावासीयांनी पाहिले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य असून मागील पाच वर्ष काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता जि.प.वर होती. राज्यात आघाडी किवा युतीचे सरकार असले तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढविताना स्थानिक स्तरावर निर्णय घेतले जात असतात. सध्या महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून झालेल्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र हेच समीकरण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कायम राहणार नसल्याचे सांगत तिन्ही पक्षांनी एकला चलो रे चा सूर आवळत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत एकत्रित असलेले तिन्ही पक्ष समोरासमोर आल्यास काहीच वावगे वाटणार नाही. स्थानिक स्तरावर या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुध्दा पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशीच इच्छा आहे.

........

नेते झाले सक्रिय, कार्यकर्ते करून लागले गर्दी

कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून आता सर्वच व्यवहार जवळपास सुरळीतपणे सुरू झाले आहे. शासनाने सुध्दा निवडणुका घेण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीची घोषणा हाेण्याची शक्यता आहे. तर सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहे. तर तिकिटासाठी कार्यकर्ते आतापासून फिल्डिंग लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

..............

प्रक्रिया सुरू होण्याकडे लक्ष

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्कलनिहाय आरक्षण घोषित करून त्यावर आक्षेप मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. तसेच विभागीय आयुक्तांकडून अंतिम यादी जाहीर केली जाणार होती. परंतु या दरम्यान पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा रखडली होती. मात्र ही प्रक्रिया आता पुन्हा केव्हा सुरू होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

.............

झेडपीची निवडणूक स्वबळावरच

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी गोंदिया येथे पत्रकार परिषदे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारीसुध्दा स्वबळाची भाषा करीत आहेत. त्यामुळेच यंदा झेडपीच्या निवडणुका या सर्वच पक्ष स्वबळावर लढवतील, हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Brother unlocked now when ZP election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.