बीएसएनएल कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 09:30 PM2019-04-20T21:30:26+5:302019-04-20T21:31:11+5:30
संपूर्ण जिल्हाभरात बीएसएनएल सेवा मागील महिन्यात वीज बिलाचा भरणा न केल्याने ठप्प झाली होती. त्यात सालेकसा तालुक्यातील परिस्थिती काही वेगळी नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : संपूर्ण जिल्हाभरात बीएसएनएल सेवा मागील महिन्यात वीज बिलाचा भरणा न केल्याने ठप्प झाली होती. त्यात सालेकसा तालुक्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. परंतु आमगाव व गोंदिया सारख्या ठिकाणी बीएसएनएल कार्यालयात अधिकारी-कर्मचारी असताना सालेकसा तालुका मात्र याबाबतीत अत्यंत दयनीय परिस्थितीत आहे. मागील १० ते १२ वर्षांपासून येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये एकही अधिकारी वा कर्मचाºयाची नियुक्ती झालेली नाही.
तालुक्यात सालेकसा, दरेकसा, पिपरिया, नवाटोला, भजेपार, साखरीटोला अशा ठिकाणी बीएसएनएल टॉवर उपलब्ध आहेत. जे सालेकसा टेलिफोन एक्सचेंज अंतर्गत येत असून यातील सालेकसा आणि साखरीटोला सोडून इतर सर्व दुर्गम आणि अति संवेदनशील भागात आहेत. यामुळे त्या परिसरातील नागरिक मोबाईल सेवेपासून वंचित झाले आहेत. दुर्गम भागात तर इतर कुठली खाजगी सेवा सुद्धा नसल्याने त्यांना एक कॉल करण्यासाठी पायपीट करावी लागते. गावकरी व विविध संघटनांकडून सेवा पूर्ववत करण्याची मागणी कित्येकदा करण्यात आली. परंतु काहीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ज्या ठिकाणी खाजगी सेवा उपलब्ध आहे, त्याठिकाणी नागरिक बीएसएनएल सोडून इतर खाजगी नेटवर्ककडे वळताना दिसत आहेत. दरेकसा परिसरात सेवा खोळंबली असल्याने तरु ण मंडळी इंटरनेट आणि फोन कॉल करिता बेनीडोह टेकडीवर (दरेकसा घाट) जावून मोबाईल वापरताना दिसतात. त्यामुळे गावातील तरु ण घरी आणि गावात न राहता टेकडीवर मोबाईल वापरताना दिसत असल्याचे चित्र आहे.
कर्मचारी निवासस्थान जीर्णावस्थेत
लाखो रु पये खर्च करून येथील टेलिफोन एक्सचेंज येथेच कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था म्हणून निवासस्थान तयार करण्यात आले होते. मात्र आज ते निकामी पडले असून जीर्ण होण्याच्या वाटचालीकडे आहेत. जेथे कर्मचारीच नाहीत, तेथे एवढे पैसे खर्च करून निवासस्थान कशाला तयार केलेत असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी शिपाही, देखभाल करण्यासाठी तांत्रिक सहायक अशी कित्येक पदे मागील १० ते १२ वर्षांपासून रिक्त पडून आहेत. एकंदर बीएसएनएल बद्दल शासन आणि प्रशासनाची अशी सावत्र वागणूक बघता भविष्यात बीएसएनएल बंद होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे.