वीज कापल्याने बीएसएनएल सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:00 AM2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:18+5:30
भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून येतो. तो कधी प्राप्त होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने सहा महिन्यांचे वीज बिल थकविले आहे. परिणामी वीज वितरण कंपनीने त्यांची वीज कापल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागात सेवा ठप्प झाली आहे. याचा ग्राहकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.
तालुक्यात अर्जुनी येथे तीन, नवेगावबांध येथे दोन तसेच गोठणगाव, केशोरी, महागाव, इटखेडा, वडेगाव व बोंडगावदेवी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे मनोरे आहेत. तसेच भरनोली, धाबेटेकडी व नवनीतपूर येथे सौर उर्जेवर चालणारे मनोरे आहेत. यापैकी केवळ अर्जुनी-मोरगाव येथील दोन मनोरे सुरू असून इतर सर्व मनोऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. या सर्व मनोऱ्यांचे १८ लक्ष ३१ हजार १९० रु पयांचे वीज बिल गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याचे समजते. येथील चालू महिन्याचे एक लक्ष ६७ हजारांचे बिल आले आहे. अशात वीज वितरण कंपनीने वीज कापल्याने भारत संचार निगमच्या सेवेपासून ग्राहक वंचित आहेत.
भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून येतो. तो कधी प्राप्त होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीने ग्राहकांना सवलतीचे आमिष दाखवून वार्षिक रिचार्ज शुल्क घेतले आहेत. मात्र अशी सेवा खंडित करून ग्राहकांची फसवणूक केली आहे असा आरोप केला जात आहे. अशा प्रकारांमुळे खासगी कंपन्यांनी येथे घट्ट पाय रोवले आहेत. ही समस्या केंद्र शासनाशी निगडित आहे. मात्र खासदार सुनील मेंढे यांचे परिसरात दौरे होत नसल्याने कैफियत मांडायची कुणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाठपुरावा सुरू आहे
थकीत वीज बिल संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. महागाव येथील सेवा येत्या एक-दोन दिवसांत सुरू होईल. अर्जुनी-मोरगाव येथील दोन मनोºयांचा वीजपुरवठा सुरू आहे. निधी प्राप्त होताच थकीत विज बिलांचा भरणा केला जाईल व सेवा सुरळीत होईल, अशी माहिती दूरसंचार अधिकारी परिहार यांनी दिली.