बीएसएनएलचे अद्याप २२ कनेक्शन कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:19+5:30
मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वीज बिलाची थकबाकी न भरल्याचा फटका म्हणून वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचे कनेक्शन कापले आहेत. मंगळवारी (दि.१०) अर्जुनी-मोरगाव येथील चार व तिरोडा येथील दोन कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने सहा कनेक्शन जोडण्यात आले होते. मात्र २२ कनेक्शनची बत्ती गुली होतीच व त्यांची ३८.६८ लाखांची थकबाकी कायम असल्याची माहिती आहे.
मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी लागते. हाच प्रकार आता पुन्हा एकदा घडून आला आहे. यंदा महावितरणने गोंदिया, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात बीएसएनएलला दणका दिला आहे. महावितरणने यंदा २८ एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली होती.परिणामी बीएसएनएल ग्राहकांची चांगलीच फसगत होत आहे. मंगळवारी (दि.१०) बीएसएनएलच्या कापण्यात आलेल्या कनेक्शनची स्थिती जाणून घेतली असता २८ पैकी तिरोडा तालुक्यातील दोन कनेक्शनचे तर अर्जुनी-मोरगाव येथील पाच कनेक्शनचे पैसे भरण्यात आल्याने हे सहा कनेक्शन सुरू करण्यात आल्याचे कळले. मात्र त्यानंतरही २२ कनेक्शनची बत्ती मंगळवारीही गुल होती. यात, गोंदिया शहरातील तीन कनेक्शन बंद असून त्यांची सुमारे चार लाख रूपयांची थकबाकी आहे. तिरोडा तालुक्यातील तीन कनेक्शन बंद असून तेथील सुमारे १८ लाख रूपयांची, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० कनेक्शन बंद असून त्यांची १३.६८ लाख रूपयांची थकबाकी आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील सहा कनेक्शन बंद असून त्यांची तीन लाख रूपयांची अशी एकूण ३८ लाख ६८ हजार रूपयांची थकबाकी कायम आहे.