बुचाटोला, रूस्तमपूर झाले काश्मीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:35 PM2018-02-14T21:35:35+5:302018-02-14T21:36:52+5:30
जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काही क्षणातच गारांचा वर्षाव सुरू झाला. हा वर्षाव ४५ मिनिटे सतत सुरु राहिला व १०. १५ वाजता बंद झाला.
ऑनलाईन लोकमत
सुकडी (डाकराम) : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काही क्षणातच गारांचा वर्षाव सुरू झाला. हा वर्षाव ४५ मिनिटे सतत सुरु राहिला व १०. १५ वाजता बंद झाला. त्यामुळे जम्मू-काश्मिर व आसाममध्ये बर्फाचा वर्षाव होतो तशीच स्थिती बुचाटोला व रुस्तमपूरची झाली होती.
जिकडे-तिकडे ६ ते ८ इंच तर कुठे १ फुटाच्या गारांचे थर संपूर्ण गावात व शेतामध्ये होते. अशाप्रकारे गारपिटीचा पाऊस कधी झाला नसल्याचे वयोवृद्धांनी सांगितले. या गारांच्या पावसाने बुचाटोला व रुस्तमपूर येथील शेतामधील भाजीपाला, हरभरा, वटाणा, गहू या पिकांचे नुकसान झाले. तर आंब्याचा मोहोर पूर्णपणे गळाला. गारपिटीमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले. रात्री बुचाटोला व रुस्तमपूर परिसर हा जम्मु कश्मीर दिसत होता. गावकऱ्यांना सकाळी उठल्यानंतर जिकडे तिकडे बर्फाची चादर दिसत होती. शेतामध्ये सुद्धा गारांचे थर जमा झाले होते.
खंड विकास अधिकारी जावेद इनामदार, तहसीलदार संजय रामटेके, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, उपविभागीय अधिकारी गंगाराम तडपाळे यांना भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. खंड विकास अधिकारी इनामदार यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. कश्मीर व आसामचे रूप बुचाटोला व रूस्तमपूर या गावांना आल्याचे त्यांना वाटले. जिकडे तिकडे गारांचे थर साचले होते. खडकी, डोंगरगाव, पिंडकेपार, मेंढा, इंदोरा, निमगाव या गावांमध्ये गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान बुचाटोला व रुस्तमपूर येथील शेतकऱ्यांचे झाले. धर्मदास जांभुळकर, ताराचंद जांभुळकर, तुलसीदास पाटील, युवराज पाटील, धर्मराज पाटील, राधेशाम पटले, राधेशाम पटले, पुष्पा जांभुळकर, उमाशंकर पटले, बलीदास जांभुळकर, ओंकारसिंह पटले व गावातील सर्वच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जि.प.सदस्य रजनी कुंभरे, जावेद इनामदार यांच्यासह सरपंच प्रभा जांभुळकर, सदस्य प्रेमलता पाटील, भाऊराव साखरे, युवराज पाटील, देवेंद्र जांभुळकर, तुलसीदास पाटील, धर्मदास जांभुळकर, गिरधारी पाटील यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.