बकी गेटमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:30 AM2018-01-31T00:30:32+5:302018-01-31T00:30:54+5:30
राजेश मुनीश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एक प्रवेशव्दार सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमाराजवळ बकी गेट आहे. मागील दोन तीन वर्षांपासून हे बंद होते. मात्र वन्यजीव विभागाने बकी गेट सुरू केल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वनीच ठरत आहे. कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वरुन तीन किमी अंतरावर बकी गेट तयार करण्यात आले आहे. या गेटवरुन सडक-अर्जुनी, देवरी, गोरेगाव, गोंदिया, साकोली, रायपूर या शहराकडून पर्यटक पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याची नोंद आहे.
मागील वर्षी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे बकी गेट बंद ठेवण्यात आले होते. आता प्रकल्पातील अंतर्गत रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या १ आॅक्टोबर २०१७ पासून बकी गेट पुन्हा पर्यटकांसाठी नियमित सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जाण्याकरिता आॅनलाईन व आॅफलाईन बुकींगची सुविधा वन्यजीव विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ १५२.५८ चौ. कि. मी. आहे. नवेगाव व्याघ्र प्रकल्प विविधतेने नटलेले अभयारण्य असून पर्यटकांसाठी भूषण ठरत आहे. जिल्ह्यातील पर्यटकांना जाण्यासाठी सडक- अर्जुनी तालुक्यातील बकीगेट हे सोयीचे ठरत आहे. या गेटमुळे पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पातील झनकारगोंदी तलाव, कालीमाटी, कवलेवाडा गवत व कुरणाचे रान पाहयला मिळत आहे. व्याघ्र प्रकल्पात आता मानवाचे वास्तव्य नसल्यामुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांना कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी तलाव टी के जार्इंट पार्इंट या ठिकाणी वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होते. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटनाचा खरा आनंद हा उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी व सायंकाळच्या वेळी अभयारण्यात येतो. नवेगाव व्याघ्र प्रकल्पात विविध औषधीयुक्त वनस्पती पहावयास मिळतात. हा परिसर जैवविविधतेने नटलेला असल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बकी गेट येथे वनरक्षक आनंद गावले तर वनक्षेत्र सहायक सुनील भोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकी गेटमुळे कोसबी परिसरातील बेरोजगारांना सुगीचे दिवस येतील.
रस्ता दुरुस्तीची गरज
बकी गेटला जाण्यासाठी कोसबीमार्गे जावे लागते. कोसबी ते बकी गेटपर्यंत जाण्याचा खडीकरणाचा रस्ता हा ठिकठिकाणी उखडला आहे. गिट्टी बाहेर निघाली असल्याने या मार्गावरुन ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. त्यासाठी वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
स्थानिकांना मिळाला रोजगार
बकी गेटच्या माध्यमातून कोलारगाव, कोसबी, बकी, मेंडकी, कोहमारा गावातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बकी गेट याठिकाणी गाईडची सुविधा आहे. वन्यजीव विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोहमारा ते कोसबी गावापर्यंत विविध प्राण्याचे चित्र, मार्गदर्शक फलक येथे लावण्याची गरज आहे.