बुद्ध धम्म जगभर पोहोचला
By admin | Published: May 30, 2017 12:58 AM2017-05-30T00:58:48+5:302017-05-30T00:58:48+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते.
रामदास आठवले : भीमघाट येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर बुद्ध धम्म जगभर पोहोचला. बुद्धाचे तत्त्वज्ञान हे विज्ञानावर त्याचबरोबर स्वातंत्र, समता आणि बंधुता यावर सुद्धा आधारित आहे. सम्राट अशोकाने जगभर विविध ठिकाणी उभारलेल्या अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुद्ध धम्म जगभर पोहोचला, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
येथील पांगोली नदी काठावरील भिमघाट येथे रविवारी (दि.२८) आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण व पुरस्कार वितरण कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून भंते महाथेरो डॉ.राहूल बोधी, डॉ.अशोक शिलवंत, डॉ.प्रशांत पगारे, माजी आमदार अनिल गोंडाणे, बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील, भुपेश थुलकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सदस्य सुलक्षणा शिलवंत, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, न.प.सभापती दिलीप गोपलानी, विनोद किराड, राजा बंसोड व रमेश टेंभरे उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार आठवले यांनी, सम्राट अशोकांनी अनेक स्तुप निर्माण केले. त्यापैकी सांचीचा स्तुप हा एक असून तो जगप्रसिध्द आहे. डॉ.आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडली. माणसाला माणसाशी जोडणारी भूमिका मांडली. डॉ.आंबेडकरांनी माणसाला माणूस बनविणारा धम्म, मनातील अहंकार संपुष्टात आणणारा धम्म, बुध्दीवादी धम्म, विज्ञानवादी धम्म अशाप्रकारच्या धम्माचा स्विकार केला. डॉ.आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांच्या विचारांची चळवळ चालविण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत असे सांगीतले. पालकमंत्री बडोले यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २३ एप्रिल १९५४ मध्ये या स्थळाला भेट दिली होती. परंतु अनेक वर्ष या पवित्र स्थळाचा विकास झाला नाही. राज्याचा सामाजिक न्यायमंत्री म्हणून या भिमघाट स्मारकाच्या विकासासाठी एक कोटी रु पये मंजूर केले आहे. अशोक शिलवंत हे देशात प्रमुख 14 ठिकाणी अशोक स्तंभ उभारत आहे. त्यांना येथे अशोक स्तंभ उभारण्याची विनंती केली असता, ती त्यांनी मान्य केल्याचे सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून नामदार बडोले यांनी, बौध्द विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा व केंद्रात बौध्दांना आरक्षण देण्याचा कायदा अस्तित्वात यावा यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. यासंबंधाने बैठकाही घेण्यात आल्या आहे. अनुसूचित जातीचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाच्या विविध योजना नियोजनबध्द पध्दतीने राबविण्यात येत आहे. ज्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे त्यामध्ये सुधारणा निश्चित करण्यात येतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांच्या विचाराला वाहून घेण्याचे काम केले. हे अशोक स्तंभ त्यांच्या विचाराच्या प्रसाराचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
भंते डॉ.राहूल बोधी यांनी, जगातील १३४ देश बौध्दमय आहेत. या देशातील नागरिक बुध्दाच्या तत्वज्ञानाचे पालन करतात. डॉ.आंबेडकरांमुळे आपल्याला जगातील महान बुध्द धम्म लाभला आहे. हे अशोक स्तंभ इतिहास निर्माण करु न जाईल असे मत व्यक्त केले.
पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेवून आठव्या अशोक स्तंभाचे लोकार्पण केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अशोक रत्न पुरस्काराने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अशोक विभूषण पुरस्काराने सुर्तीसेन वैद्य, अनिल सुखदेवे, अजित मेश्राम, अशोक भूषण पुरस्काराने भागवत गायकवाड, अशोक बेलेकर, अशोक मित्र पुरस्काराने विश्वजीत डोंगरे, संतोष बिसेन, सुरेंद्र खोब्रागडे, संघमित्र पुरस्काराने नागाबाई पोपलवार, समता गणवीर, अशोक काव्य भूषण पुरस्काराने डॉ.नुरजहा पठाण, महेंद्र पुरस्काराने यादव मेश्राम व मिलिंद बांबोळे यांना सन्मानीत करण्यात आले.