आरोग्य व कृषी क्षेत्राला संजीवनी देणारा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:53+5:302021-03-09T04:32:53+5:30
गोंदिया : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने आरोग्य ...
गोंदिया : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर भर देण्यात आला. आरोग्य विषयक सुविधेसाठी ७ हजार कोटी, प्रत्येक जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल,७ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी २ हजार कोटी रुपये, कृषी पंपाच्या थकीत वीज बिलावर ३३ टक्के सवलत असे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प आरोग्य आणि कृषी क्षेत्राला संजीवनी देणारा असल्याची प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांनी दिली. तर विरोधकांनी सर्वसामान्यांसाठी काहीच नसल्याने हे बजेट पूर्णपणे निराशजनक असल्याची टीका केली आहे.
.......
सर्वसामान्यांची झाली निराशा
सर्वसामान्यांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. कोरोना संकट काळात वाढीव वीज बिल देण्यात आले होते. त्यावर तोडगा न काढता लोकांच्या तोंडाला पाने पुसली. मराठवाडा आणि विदर्भाच्या तोंडाला पाने पुसून एकट्या मुंबईकडेच शासनाचा कल दिसला आहे.
-आ. विजय रहांडगडाले,
........
सर्व समावेशक असे बजेट
महाराष्ट्र सरकारने आरोग्य, कृषी, दळणवळण, सामाजिक न्याय, अनुसूचित जातीसाठी तरतूद या बजेटमध्ये केली आहे. शेतकऱ्यांना ३ लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची सोय केली आहे. महिलांसाठी महिला दिनीच योजना कार्यान्वित केली आहे. प्रत्येक पैलूचा विचार या बजेटमध्ये करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प आहे.
-आ. मनोहरराव चंद्रिकापुरे,
................
लोकाभिमुख अर्थसंकल्प
महाविकास आघाडी सरकारने सर्वच क्षेत्रांचा समतोल साधत अर्थसंकल्प सादर केला आहे. आरोग्य, कृषी, सिंचन यावर सुध्दा भर देत प्रथमच वाढीव निधी दिला आहे. गोसेखुर्दसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिलांसाठी सुध्दा विशेष योजना घोषित केली आहे. एकंदरीत लोकाभिमुख अर्थसंकल्प आहे.
- राजेंद्र जैन, माजी आमदार
.......
अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प
गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी या बजेटमध्ये कसलीच तरतूद करण्यात आली नाही. महाराष्ट्राचे बजेट सादर करताना तरतूद करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु कोणत्या कामासाठी किती तरतूद केली हेच सांगितले नाही. केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.
- केशवराव मानकर, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजप
..............................
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. घरकामगार महिलांसाठी विशेष तरतूद, शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, मुलींना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेच्या बसेसमध्ये वाढ असे चांगले निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहे.
- दिलीप बन्सोड, माजी आमदार.