दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:36 PM2018-03-24T22:36:51+5:302018-03-24T22:36:51+5:30
दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासठी राज्य सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवार (दि.२४) देवरी येथे केली.
आॅनलाईन लोकमत
देवरी : दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासठी राज्य सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवार (दि.२४) देवरी येथे केली.
देवरी येथे दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा आयोजित व कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगर पंचायत क्रीडांगणावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव २०१८ आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, सभापती सुनंदा बहेकार, नगराध्यक्ष सुमन बिसेन, आयुक्त अपंग कल्याण आयुक्तालय नितीन पाटील, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण सिद्धार्थ गायकवाड, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, झामसिंग येरणे उपस्थित होते.
बडोले म्हणाले, भविष्यात दिव्यांगाना आधार व प्रोत्साहन मिळावे याकरिता शासन कटीबद्ध आहे. दिव्यांग बांधवांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणार, क्रीडा शिक्षकांना सुधारित वेतन, मतीमंदाना आधार गृह निर्माण करुन देण्यात येईल. दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के निधी प्रत्येक गावाला मिळेल याची काळजी घेतली जाईल. जानकार म्हणाले, दिव्यांगाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करताना आनंद होत आहे.
महाराष्टÑाच्या पूर्व टोकाला ग्रामीण भागात ऐवढी मोठी स्पर्धा होणे फार मोठी बाब अहे. जिल्ह्याचा व जिल्ह्याच्या प्रतिनिधींचा गौरव वाढवणारी ही स्पर्धा आहे. दुग्ध व मत्स्य विभागात दिव्यांगाना ३ टक्के आरक्षण देणार असल्याचे सांगितले. या वेळी सर्व मान्यवरांनी कृष्णा सहयोगी संस्था देवरीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पाटील यांनी मांडले.
सूत्र संचालन जवाहर गाढवे यांनी तर आभार झामसिंग येरणे यांनी मानले.