इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:16 PM2018-07-12T22:16:33+5:302018-07-12T22:16:58+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) वॉर्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल केली जात आहे.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) वॉर्डात पाणी साचल्यानंतर या रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाची पोलखोल केली जात आहे. मागील तीन वर्षांपासून बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाची प्रशासनाला किती काळजी आहे हे सुध्दा दिसून येते.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी शासनाने गोंदिया येथे बाई गंगाबाई महिला रुग्णालय सुरु केले. रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम १९३९ मध्ये करण्यात आले. एकूण दोनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात सध्या केवळ १८५ खाटाच उपलब्ध आहे. त्यामुळे बरेचदा दाखल रुग्णांची सख्या वाढल्यास त्यांना रुग्णालयाच्या वºहांड्यात खाटा लावून दाखल केले जाते. रुग्णालयाच्या इमारतीला आता ८० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे इमारत सुध्दा जीर्ण झाली असून पावसाळ्यात काही ठिकाणी गळती सुध्दा लागते. या रूग्णालयात महिला तसेच लहान बालकांना दाखल करुन उपचार केले जाते. त्यामुळेच जीर्ण झालेल्या इमारतीमुळे रुग्णांच्या जीवाला कुठलाही धोका होवू नये, यासाठी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे. यासाठी बीेजीडब्ल्यू रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २०१५ पासून वांरवार पत्र दिले. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही बांधकाम विभागाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नाही. त्यामुळे इमारत राहण्यायोग्य आहे किंवा नाही, इमारतीची कुठे कुठे दुरूस्तीची गरज आहे. याची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळेच आठ दिवसांपूर्वी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात गुडघाभर पाणी साचल्याचा प्रकार घडल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
विशेष म्हणजे बीजीडब्ल्यू रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. सध्या स्थितीत दीडशेवर महिला व बालरुग्ण येथे दाखल आहेत. तर मागील तीन वर्षांपासून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटच झाले नसल्याने ही इमारत राहण्यायोग्य आहे किंवा नाही.
जीर्ण झालेल्या इमारतीचा एखादा भाग कोसळून एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील निर्माण झाला आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाने कसलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही हातावर हात ठेवून गप्प राहण्याची भूमिका घेतली आहे.
स्टोअररुममध्ये साचते गुडघाभर पाणी
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या केवळ महिला वार्डातच पाणी साचत नाही तर या रुग्णालयाच्या स्टोअररुममध्ये सुद्धा गुडघाभर पाणी साचते. या स्टोअररुममध्ये सलाईन, सिरींज, गोळ्या आणि औषधांचे बॉक्स ठेवले होते. ते या रुममध्ये पाणी साचल्याने खराब झाले. त्याची आठ दहा दिवसांपूर्वीच रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची विल्हेवाट लावल्याची माहिती आहे. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे गोरगरीब रुग्णांसाठी येणारा औषधांचा साठा खराब होत असून रुग्णांना औषधे मिळण्यापासून वंचित राहावे लागते.
बीजीडब्ल्यूचे अस्तित्व काहीच दिवस
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्याच्या कामाला देखील सुरूवात झाली आहे. त्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेले केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाचा समावेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरात बीजीडब्ल्यूचा स्वतंत्र कारभार संपुष्टात येणार असून येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
तीन वर्षांत बांधकाम विभागाला ११ पत्र
बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे.यासाठी रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन वर्षांत ११ वेळा पत्रव्यवहार केला. मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कधी तांत्रिक तर कधी कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे सांगत याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांना रुग्णांच्या जीवाची किती काळजी आहे दिसून येते.
शेरा मारुन विभाग मोकळा
बीजीडब्ल्यू रूग्णालयाच्या महिला वार्डात पाणी साचल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी भेट देवून इमारतीची पाहणी केली. तसेच रुग्णालयाची इमारत ८० वर्षे जुनी असून रस्त्यापेक्षा इमारत दोन फूट खाली असल्याने रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याचे उत्तर व शेरा मारुन तो शासन आणि प्रशासनाला पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानली.
विद्युत विभाग बिनधास्त
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मागील वर्षभरापासून रुग्णालयातील जनरेटर बिघडलेले आहे. तर कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने उच्च दाबाच्या लाईनवरुन विद्युत पुरवठा करण्यात यावा. तसेच रुग्णालयातील विद्युत दुरूस्तीची कामे करण्यात यावी. यासाठी रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला अनेक पत्रे दिली. मात्र त्यांनी अद्यापही ही समस्या गांर्भियाने घेतली नाही. त्यामुळेच रुग्णालयातील जनरेटर बंद असून विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णाना अंधारात राहावे लागते.
विद्युत गेल्यास सोनोग्राफी यंत्र बंद
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात अद्यापही पर्यायी जनरेटर आणि युपीएस उपलब्ध करुन देण्यात आले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास सोनोग्राफी काढण्याचे व रुग्णांना प्रमाणपत्र देण्याचे काम पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे रुग्णांना बरेचदा मनस्ताप सहन करावा लागतो.या विभागात जनरेटर उपलब्ध करुन देण्यात यावे. यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र ही बाब प्रशासनाला अद्यापही महत्त्वाची वाटली नाही.