इळदा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ठरतेय शो पीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:38+5:302021-06-27T04:19:38+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इळदा या गावाची अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आदिवासीबहुल म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या गावासह परिसरातील नागरिकांच्या ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इळदा या गावाची अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आदिवासीबहुल म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या गावासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाचे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून दोन वर्षांपूर्वी भव्य इमारत तयार केली; परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर कर्मचारी वर्ग नियुक्त करून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित न केल्यामुळे येथील इमारत शो पीस ठरत आहे.
इळदा येथील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी इतर ठिकाणी जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा असा हनुमान चालीसा अविरत पठण आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून जिल्हा प्रशासनाला दिला आहे. इळदा गावासह परिसरातील राजोली, भरनोली, खडकी, तिरखुरी, कुणबीटोला, बलीटोला, सायगाव, तुकुम, जांभळी, धमदीटोला, अरततोंडी या नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गावातील नागरिकांना केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून आरोग्य सेवा घेण्याची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने सात वर्षांपूर्वी ग्राम इळदा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून भव्य इमारतीचे बांधकाम केले.
.........
दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम
आरोग्य केंद्रांची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटूनही या इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नवनिर्मित इमारत शोभेची वास्तू ठरत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची काही हालचाल दिसून येत नाही. या परिसरातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य उपचारासाठी इतर स्थळी जाण्याची पायपीट करावी लागत आहे. परिणामी, बाहेर जावून आरोग्य सेवा घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना वाटेत जीव सोडावा लागतो, तर गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
..........
हनुमान चालीसा पाठ करून वेधणार लक्ष
जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत तयार असतानाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले नाही. या मागणीला घेऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील नाकाडे यांनी निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन करून सर्व सोई-सुविधेसह कार्यान्वित केली नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात अखंड हनुमान चालीसा पठन करून उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.