‘मुझे गोली दे दो’ म्हणताच झाडली गोळी

By admin | Published: April 17, 2016 01:30 AM2016-04-17T01:30:10+5:302016-04-17T01:30:10+5:30

‘सिस्टर मैने खाना खा लिया हू, मुझे गोली दे दो’ असे म्हणताच औषधीच्या गोळीऐवजी गावठी पिस्तुलातील गोळी पंकज यादव याला खावी लागली.

The bullet shot as 'shoot me' | ‘मुझे गोली दे दो’ म्हणताच झाडली गोळी

‘मुझे गोली दे दो’ म्हणताच झाडली गोळी

Next

पोलिसांची निगराणी कुचकामी
गोंदिया : ‘सिस्टर मैने खाना खा लिया हू, मुझे गोली दे दो’ असे म्हणताच औषधीच्या गोळीऐवजी गावठी पिस्तुलातील गोळी पंकज यादव याला खावी लागली. पण दैव बलवत्तर म्हणून गोळी पोटात शिरण्याऐवजी काठाने स्पर्शून आरपार निघून गेली.
गोंदियाचे माजी न.प.उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पंकज यादव याच्यावर शुक्रवारी रात्री गोळी झाडण्याचा प्रकार सर्वांनाच थक्क करणारा होता. जेवण करून तो आपल्या खोलीत प्रवेश करीत असतानाच त्याच्यावर आरोपींकडून पिस्तूलमधून गोळी झाडण्यात आली. गोळी पोटातून आरपार निघाल्याने तो पोट धरून खोलीत बसला. यावेळी त्या खोलीत असलेल्या पोलीस शिपायाने व नातेवाईकांनी आतून दार लावून घेतले. त्यामुळे पंकज यादव व खोलीत असलेले सर्व बचावले.
शुक्रवारच्या रात्री ८.३५ वाजता यादव याच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणात सहा आरोपींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. १३ जून २०१५ रोजी शहराच्या तहसील कार्यालय समोरील आंबेडकर पुतळ्याजवळ सफाई कामगार नेता छेदीलाल इमलाह यांचा गोळी मारून खून करण्यात आला. त्या खुनाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक झाली होती. त्याच हत्याकांडात आरोपी म्हणून पोलिसांनी पंकज यादवला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंकज यादवला न्यायालयाने जामीन नाकारला होता. ६ फेब्रुवारी रोजी यादवने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रामनवमी असल्यामुळे पंकज यादवची पत्नी ललिता हिने पंकज यादवकरिता महाप्रसाद आणला होता. एका नातेवाईकाला घेऊन ललिता केटीएसमध्ये आली. पत्नीने आणलेला महाप्रसाद पंकजने सेवन केल्यानंतर तो खोलीत फिरत होता. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वॉर्ड क्र. २ च्या साईड रूम नं.१ मध्ये पंकज यादवला ठेवण्यात आले होते. यादवच्या संरक्षणासाठी पाच पोलीस ठेवण्यात आले होते. परंतु त्यातील एकच पोलीस त्या ठिकाणी हजर होता. तर पंकज यादवची पत्नी ललिता व सोबत आलेला एक नातेवाईक असे चार जण हजर होते. पत्नीने आणलेला महाप्रसाद सेवन केल्यानंतर आपल्या खोलीत यादव फिरत होता. त्यांनी परिचारिकेला ‘सिस्टर मैने खाना खा लिया हू, मुझे गोली दे दो’ म्हणून आवाज दिला. त्यानंतर आपल्या खोलीत परतत असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. डाव्या कुशीतून गोळी आरपार गेली. गोळी झाडल्यानंतर त्या खोलीतच असलेले पोलीस नायक जागेश्वर उईके यांनी दार बंद करून घेतले. यावेळी हल्लेखोरांनी दाराला धक्का दिला. परंतु पोलीस व यादव याच्या नातेवाईकांनी दार बंद करून दाराला पकडून ठेवले. एक गोळी झाडल्यानंतर आरोपी लगेचच फरार झाले. गोळी झाडणाऱ्या आरोपींपैकी एकाकडे चाकूही असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी शहर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात सहा आरोपी असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात राजा सांदेकर, निशांत ऊर्फ अण्णा हुकूमचंद बिरीया, अजय बिरीया, अभिमन्यू चतरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंविच्या कलम ३०७, ३४, १२० ब सहकलम ३, २७, ४, २५, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

आरोपीच्या शोधासाठी पाच चमू
पंकज यादवरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पाच चमू तयार करण्यात आल्या. त्यात पोलीस अधीक्षकांच्या दोन चमू, स्थानिक गुन्हे शाखेची एक चमू तर शहर पोलीस ठाण्याच्या दोन चमू अशा पाच चमू तयार करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली. शहरासह बालाघाट, नागपूर या ठिकाणीही शोध मोहीम सुरू आहे.

वर्षभरातील दुसरा हल्ला
पंकज यादववर प्राणघातक हल्ले होत आहेत. मागील वर्षभरातील हा दुसरा प्राणघातक हल्ला झाला आहे. १७ मार्च २०१५ रोजी नगरपरिषदेच्या आवारात लोखंडी राडने हल्ला करण्यात आला. तर दुसरा हल्ला १५ एप्रिल २०१६ रोजी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आला.

- घटनाक्रमावर संशयाचे धुके
पंकज यादव केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल असताना त्यांची पत्नी ललीताने केटीएस व पोलीस विभागावर आरोप केला होता. पंकजला भंडारा रूग्णालयात हलविण्याची मागणी केली होती. आपल्या पतीला धोका आहे असे तिने म्हटले होते.
पंकज यादव याच्या पोटातून आरपार निघालेली गोळी कुठे आढळली याचे निशाण पोलिसांना दिसले नाही. एक गोळी पोलिसांनी जप्त केली. परंतु ती गोळी किती एमएमची आहे हे केमिकल चाचणीनंतरच कळेल.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकज यादववर उपचार करण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. राजेंद्र जैन, डॉ. मेश्राम, डॉ. सिंग, डॉ. तुरकर, डॉ. सनी जायस्वाल, डॉ.बी.डी. जायस्वाल व डॉ.मोनल अग्रवाल वेळीच दाखल झाले. त्यांनी उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात १०८ या रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले.
६ फेबु्रवारी रोजी अटक झालेला पंकज यादव पोलीस कोठडीनंतर केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहे. पत्नीने त्याच्या जिवाला धोका आहे असे म्हटल्यावरही त्याला इतरत्र न हलविणे म्हणजे या मागील हेतू लक्षात येत नाही.

Web Title: The bullet shot as 'shoot me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.