बंधारा फुटल्यामुळे पीक गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:22 PM2018-08-21T22:22:55+5:302018-08-21T22:28:19+5:30
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी नाल्यावर बोथली सीमेला लागून सन २०१६ मध्ये १४ लाख रुपयांच्या निधीतून कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्याव्दारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग सिंचनासाठी करण्याचा उद्देश होता. मात्र सोमवारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यालगत असलेले धानाचे पिक वाहून गेले. तर शेतातील विद्युत खांब सुध्दा वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बंधाऱ्याला सुरक्षा भिंत नसल्याने बंधाऱ्यातील पाणी धनराज पारधी, हरेश पारधी, शिला चव्हाण यांच्या शेतातृन वाहून गेले त्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
२०१५-१६ मध्ये सुध्दा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्याची सुध्दा नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसानीची माहिती तहसीलदार, लघू पाटबंधारे विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र यानंतरही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
माझ्या शेतातील धानाचे पिक, शेतात असलेली मोटार, विद्युत मिटर, पाईप लाईन तसेच इलेक्ट्रीक खांब बंधारा फुटल्यामुळे वाहून गेली. यामुळे माझे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्यापही याची नुकसान भरपाई मिळालेली नाही.
- धनराज पारधी, शेतकरीे
बंधाºयाला सुरक्षा भिंत नसल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हीच बाब लक्षात घेवून सुरक्षा भिंत बांधकामासाठी निधीची मागणी करण्यात आली. निधी प्राप्त होताच काम सुरू केले जाईल.
-धिरज कापगते, शाखा उपअभियंता लघू पाटबंधारे विभाग, आमगाव.