पाठीवरचे ओझे कायमच!
By admin | Published: August 2, 2015 01:55 AM2015-08-02T01:55:46+5:302015-08-02T01:55:46+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
शाळांना मौखिक आदेश : अंमलबजावणी मात्र शून्य
गोंदिया : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड पुस्तकांचे ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिक्षण विभागाने तसा मौखिक आदेशही अधिकाऱ्यांना दिला. पण प्रत्यक्षात कोणताही लेखी आदेश शिक्षण विभाग किंवा शाळांपर्यंत अद्याप पोहोचला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे अजूनही कायम आहे. न पेलवणाऱ्या दफ्तरांच्या या ओझ्याने विद्यार्थ्यांची वाढ खुंटत आहे.
दोन महिन्यांपूर्वी शिक्षण संचालक महावीर माने यांनी नागपूर येथे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन दप्तराचे ओझे कमी कसे करता येईल यासाठी उपस्थितांची मते जाणून घेतली. या कार्यशाळेला विस्तार अधिकारी, निवडक गटशिक्षणाधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक संघटनांचे व शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. या सभेचा एकच निष्कर्ष निघाला, दप्तराचे वजन बालकाच्या वजनाच्या १० टक्केपेक्षा जास्त नसावे. तालुकास्तरावर बैठका घेऊन मुख्याध्यापकांना याबाबतची सूचना सांगण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यात कार्यशाळा घेण्यात आल्या.
या बैठकीत मुख्याध्यापकांकडून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. जि.प. शाळातील विद्यार्थ्यांचे ओझे जास्त नाही. सीबीएसई, आयबी बोर्ड व इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्याना पुस्तकांचे ओझे अधिक असते. त्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त चित्रकला पुस्तक, योगा, मोठा कंपास, करसिव्ह रायटींगच्या अशी वेगवेगळी पुस्तके व वह्या असतात.
सोबतच पाण्याची बॉटलही आणावी लागते. परंतु जि.प. शाळातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमीच असते असा सूर मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. त्यानंतर शासनाकडून याबाबत अधिकृत पत्र ेयेणे अपेक्षित होते, मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा खासगी शाळांमध्येही शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कसलेही पत्र अद्याप पाठविले नाही. (तालुका प्रतिनिधी)
तीन विषयांचे एक पुस्तक
विद्यार्थ्याच्या पाठीवरची ओझे कमी करण्यासाठी शासनाने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तीन पुस्तकांचे एक पुस्तक तयार केले. भूगोल, इतिहास व नागरिकशास्त्र या तीन विषयाचे ‘परिसर अभ्यास’ नावाने एक पुस्तक तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयाचे एक पुस्तक म्हणजे ‘सामान्य विज्ञान’ तयार करून विद्यार्थ्यांच्या हाती दिले. पण एवढ्याने दफ्तराचे ओझे फारसे कमी झालेले नाही. शाळेतच काही पुस्तके ठेवण्याची व्यवस्था केल्यास हे ओझे कमी होऊ शकते. पण कोणत्याही शाळेने तशी व्यवस्था केलेली नाही.