चिमुकल्यांच्या खांद्यावरचे ओझे होणार कमी... शाळेत एकच पुस्तक न्यावे लागणार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:20 PM2020-07-15T12:20:52+5:302020-07-15T12:23:20+5:30
शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे तसेच वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुतीतून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात असून यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना या एकात्मिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.
आजच्या शिक्षण पद्धतीत पहिलीतील विद्यार्थ्यांनाही विविध विषयांच्या पुस्तकांचा वापर करावा लागत आहे. विविध विषयांच्या पुस्तका तसेच त्या विषयांच्या वह्या घेत विद्यार्थ्यांच्या दप्तर वजनी होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना ते आपल्या खांद्यावर लादून शाळेत ये-जा करावी लागते. शिवाय वाढत्या वर्गानुसार वह्या पुस्तकांची संख्या वाढत जाते व परिणामी दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसतही आहे. याशिवाय, वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुंतीत कित्येकदा विद्यार्थी पुस्तक शाळेत घेऊन जाणे विसरूनही जातात. अशात त्या दिवसाचा अभ्यासही मागे राहतो.
अशात इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तकांची ही गुंतागुंत संपुष्टात यावी तसेच त्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा राज्यात एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग राबविला आहे. यंदाचे हे पहिलेच वर्ष असल्याने सध्यातरी प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाने हाती घेतलेला हा प्रयोग स्तुत्य असून यामुळे विद्यार्थ्यांची नक्कीच दप्तराच्या ओझ्यापासून सुटका होणार असल्याचे दिसत आहे.
यंदाचा पायलट प्रोजेक्ट
राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा अंमलात आणलेला एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकाचा प्रयोग पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जात आहे. यावर्षी या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा अभिप्राय नोंदविला जाणार आहे. तसेच त्या आधारावर भविष्यात फक्त एका तालुक्यापुरते नव्हे तर अवघ्या राज्यातच हा प्रयोग अंमलात आणायचा काय हे ठरविले जाणार आहे. म्हणजेच, यावर्षी तरी हा प्रयोग फक्त जिल्ह्यातील एका तालुक्यापुरताच मर्यादित असल्याचे वाटत असले तरिही यंदाचा प्रतिसाद बघून पुढील वर्षी चिमुकल्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
७४ हजार ८५० विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात यंदा इयत्ता १ ते ७ पर्यंत ७४ हजार ८५० विद्यार्थ्यांची नोंद असून त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. शिक्षण विभागाला मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून या विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ३ महिन्यांसाठी १ पुस्तक अशाप्रकारे एकूण ३ पुस्तकाचे वितरण करण्यात आले आहे. तिमाही, सहामाही व वार्षीक अशा हा संच असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७४ हजार ८५० विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.
-राजकुमार हिवारे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, गोंदिया